“वडेट्टीवारांच्या विधानाला मूर्खपणा म्हणावं की…” देवेंद्र फडणवीस संतापले

पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत केले होते वादग्रस्त विधान

“वडेट्टीवारांच्या विधानाला मूर्खपणा म्हणावं की…” देवेंद्र फडणवीस संतापले

काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत वादग्रस्त विधान करत नव्या वादाला तोंड फोडले आहे. दहशतवाद्यांनी धर्म विचारून पर्यटकांची हत्या केली, असे सर्व प्रत्यक्षदर्शी आणि पीडितांचे नातेवाईक सांगत असताना विजय वडेट्टीवार यांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. दहशतवाद्यांकडे धर्म विचारून मारण्याइतका पुरेसा वेळ नाही, अशा आशयाचे विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. यावरून संताप व्यक्त होत असतानाचं आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अशा प्रकारची वक्तव्ये करुन जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. नातेवाईकांचे म्हणणं सर्व माध्यमांनी दाखवले. ज्यांच्या समोर दहशतवाद्यांनी मारले त्या नातेवाईकांनी तिकडची घटना सांगितली आहे. तिथे विजय वडेट्टीवार नव्हते. इथे बसून अशा प्रकारची वक्तव्ये करुन नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणे अतिशय वाईट आहे. याला मूर्खपणा म्हणावं की काय हे मला समजत नाही,” असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “वडेट्टीवारांचे विधान हे अत्यंत असंवेदनशील आहे. ज्यांची हत्या झाली त्यांच्या कुटुंबियांनी जे सांगितले त्याला खोटं ठरवणं यापेक्षा जास्त असंवेदनशीलता काय असू शकते. विजय वडेट्टीवारांना पीडितांचे कुटुंबिय कधीही माफ करणार नाहीत. असे मूर्खपणे विधान करणे हे एकप्रकारे जे आपले शत्रू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासारखे आहे,” असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा..

मध्य प्रदेश : बनावट मद्य चालान घोटाळ्यात ईडीचे छापे

ओटीटी आणि सोशल मीडियावर अश्लील कंटेंट गंभीर विषय

तमिळनाडूमधून ३० हून अधिक बांगलादेशी घुसखोरांना अटक

वडेट्टीवार यांची पलटी

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, “दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का? दहशतवाद्यांकडे इतका वेळ नाही की समोरचा हिंदू आहे की मुस्लिम हे विचारत बसतील. या संपूर्ण प्रकरणात अनेक गोष्टी आहेत, लोक वेगवेगळे बोलत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो. दहशतवाद्यांनी देशावर हल्ला केला आहे आणि म्हणून त्यांना पकडले पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. आज संपूर्ण देशाची ही भावना आहे. पण वेगवेगळ्या गोष्टी सांगून मूळ मुद्द्यांपासून दूर जाणे चुकीचे आहे,” असे वादग्रस्त विधान वडेट्टीवार यांनी केले आहे.

भारतमाता की जय नको! पाकिस्तान झिंदाबाद हवे ?  | Mahesh Vichare | Pahalgam Attack |

Exit mobile version