टाळ्या आणि प्रसिद्धीच्या नादात जीभ घसरल्याची अनेक उदाहरणे आहेत. त्यातच आता काँग्रेस नेते, राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भर पडली आहे. भाषणाच्या ओघात त्यांनी साधूंविषयी आक्षेपार्ह विधान केले आहे. ते एवढ्यावरच थांबले नसून त्यांनी आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर हे वक्तव्य प्रसारित केले आहे.
एका भाषणात बोलताना मंत्रीमहोदय साधू आणि संत यांच्यातील फरक सांगत होते. तेव्हा बोलताना “अजिबात विश्वास ठेवू नका या साधूंवर… साधूंसारखे नालायक लोक साऱ्या जगात नाहीत.” असे धक्कादायक विधान विजय वडेट्टीवार यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे. पण आपण आपल्या विधानावर ठाम असल्याचे वडेट्टीवार यांचे म्हणणे आहे.
संत वेगळे आणि साधू वेगळे ….
चावणाऱ्या विषारी विंचू ला ही जो वाचवितो तो संत , आणि साधू म्हणजे ? @VijayWadettiwar pic.twitter.com/ng5jzoZM5H— Office Of Vijay Wadettiwar (@VijaywaOfficial) February 12, 2021
तर भारतीय जनता पार्टी विजय वडेट्टीवार यांच्या विरोधात आक्रमक झाली असून, भाजपाच्या अध्यात्मिक समन्वय आघाडीचे समन्वयक आचार्य तुषार भोसले यांनी वडेट्टीवार मनोरुग्ण असल्याचे म्हटले आहे. वडेट्टीवार यांनी साधूंची माफी मागावी अन्यथा त्यांना मोठ्या परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही तुषार भोसले यांनी दिला आहे.
दरम्यान वडेट्टीवार यांनी पूजा चव्हाण प्रकरणातही असेच उथळ विधान केले असून, “ज्यांच्या घरातील व्यक्ती आत्महत्या करते त्यांना चिंता असते. इतरांनी चिंता करण्याची गरज नाही” असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.