बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या दोन गटाच्या कार्यकर्त्यांत धूमश्चक्री

शिवाजी पार्क, दादर येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचे नुकसान, बाचाबाची,

बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेच्या दोन गटाच्या कार्यकर्त्यांत धूमश्चक्री

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १७ नोव्हेंबर हा स्मृतिदिन. पण या दिवसाच्या पूर्वसंध्येस शिवसैनिक आमनेसामने आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि उद्धव ठाकरे गटाचे समर्थक शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी एकत्र आले आणि त्यांच्यात तुफान राडा झाला.

 

स्मृतिदिनी कोणतेही गालबोट लागू नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदल्या दिवशी जाऊन स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्याचे ठरविले. ते दर्शन घेऊन निघून गेल्यानंतर मात्र तिथे आलेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांशी शिंदेंच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांची बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीचे रूपांतर नंतर राड्यात झाले. धक्काबुक्की झाली. त्यात स्मृतिस्थळाच्या रेलिंगलाही धक्का बसला आणि त्यातील रॉड मोडल्याचे सांगितले गेले. उद्धव ठाकरे गटाचे अनिल परब, अनिल देसाई हे तिथे उपस्थित होते.

 

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी प्रकट करताना बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला गालबोट लागू नये अशी अपेक्षा व्यक्त केली. एकनाथ शिंदे म्हणाले की, पायाखालची वाळू सरकली की सगळंच संपलं अशी त्यांच्या मनात भावना आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही पुढे जात आहोत. त्यांच्या विचारांचेच सरकार आम्ही स्थापन केले आहे. खरे तर मी मुख्यमंत्री म्हणून स्मृतिदिनीही दर्शनाला जाऊ शकतो पण आदल्या दिवशी दर्शन घेऊन संभाव्य गडबड मी होऊ दिली नाही. गेल्या वर्षीही आम्ही आदल्या दिवशीच गेलो होतो.

हे ही वाचा:

मातोश्री-२मध्ये शिवभोजन थाळीचा हातभार किती?

ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरेंना पाच दिवसांची पोलीस कोठडी

ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत, आता विजेतेपदासाठी भारताशी गाठ

रेल्वेच्या मोटरमनकडे बुलेट ट्रेनचे सारथ्य?

मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही दर्शन घेतल्यानंतर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी येणे अपेक्षित होते पण त्यांनी जाणीवपूर्वक आमच्या कार्यकर्त्यांशी हुज्जत घातली, महिलांना शिवीगाळ केली, अश्लिल हावभाव केले. मी दोन्ही कार्यकर्त्यांना आवाहन करतो की, बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला गालबोट लागेल असे वागू नये.

 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावेळीही खालच्या भाषेत एकनाथ शिंदे गटावर टीका केली. बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अफझल खानाच्या अनौरस पिलावळीने जाणे बरे नव्हे, असा शब्दप्रयोग करत त्यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांबद्दल अपशब्द काढले.

Exit mobile version