24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणडळमळीत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते

डळमळीत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते

Google News Follow

Related

२०१९ साली महाराष्ट्रात झालेल्या राजकीय नाट्यानंतर शिवसेनेने हिंदूत्व सोडले आहे हे नव्याने सांगायची आवश्यकता उरली नाहीये. त्यांनी गेल्या वर्षभरातल्या आपल्या कारभारातून ते वेळोवेळी सिद्धच केलं आहे. पण सत्तेसाठी वैचारिक व्यभिचार करणारी शिवसेना आजही कपाळावर हिंदूत्वाचे कुंकू मिरवत पतीव्रतेचा आव आणत असते आणि त्याचमुळे त्यांची अवस्था ‘धोबी का कुत्ता’ अशी झालेली आहे. ना धड ते पुर्णपणे हिंदूत्वाची बाजू घेत आहेत ना धड पुर्णपणे पुरोगामित्वाचा बुरखा ओढून घेत आहेत. राजकारणात अशा भूमिका घेणे म्हणजे मध्यम मार्ग काढण्याचे लक्षण नसून आपल्या वैचारिक गोंधळाचे पुरावे असतात आणि सध्याची शिवसेना अशाच गोंधळलेल्या अर्धवटरावांची संघटना बनली आहे.

पुण्याच्या एल्गार परिषदेनंतर शिवसेनेची भूमिका हे त्याचेच उदाहरण आहे. तीन वर्षांपूर्वी एल्गार नावाच्या गटारीने महाराष्ट्रात इतकी घाण पसरवली असूनही त्यांना २०२१ साली पुन्हा परवानगी मिळाली. हे शक्य झालं ते फक्त पवार साहेबांच्या धोरणामुळे, कारण गृहखाते त्यांचेच चेले सांभाळतात. एल्गारमध्ये अपेक्षेप्रमाणे धार्मिक, जातीय आणि राष्ट्रविरोधी विखार ओकला गेला. “शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना हे होऊच कसे शकते?” असा प्रश्न महाराष्ट्राला पडला नाही, कारण शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे म्हणूनच हे होऊ शकले हे आतापर्यंत महाराष्ट्राला कळून चुकले आहे. हिंदवी स्वराज्याचा केंद्रबिंदू असलेल्या पुणे शहरात शर्जिल उस्मानी सारखा एक जिहादी विचारांचा इसम येतो, हिंदू समाजाची बदनामी करतो आणि पुन्हा ताठ मानेने निघुनही जातो. चार दिवस झाले तरी त्याच्या विरोधात साधा एफआयआर सुद्धा दाखल होत नाही. महाविकास आघाडी नावाच्या वगनाट्यात तुणतुणं वाजवत फिरणारे कार्यकारी संपादक शिरखुर्मा गिळून गप्प बसतात. त्यांच्या लेखणीचाही सुंता झाला असल्यामुळे आपले मुखपत्र मिरवत असलेल्या ‘ज्वलंत हिंदूत्वाच्या…’ बिरुदावलीचाही त्यांना विसर पडला असावा. त्यामुळे आपल्या संपादकीय मधून शर्जिलबद्दल बोलायला त्यांनी चार दिवस घेतले पण त्यातही त्यांची लेखणी उत्तर प्रदेश आणि दिल्लीकडे चेंडू टोलवण्यासाठीच झिजली.

शर्जिलचा विषय ताजा असतानाच आता एस.एम मुश्रिफ यांचे एल्गारमधले भाषण आता व्हायरल होत आहे. लोकमान्य टिळकांना “चुकून लोकमान्य म्हटले जाते” असे विधान त्यांनी केले आहे. हे तेच मुश्रिफ आहेत ज्यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी ‘हू किल्ड करकरे?’ नावाचे अतिशय भंपक पुस्तकही लिहिले होते. याच मुश्रिफांचे भाऊ हसन मुश्रिफ हे ठाकरे सरकारमधले एक मंत्री आहेत आणि ते पण राष्ट्रवादीच्या कोट्यातून. त्यामुळे मुश्रिफांचा निषेध करणे म्हणजे थेट पवारांशी वाकड्यात जाणे आणि ते करण्याची हिंम्मत शिवसेनेची नाही. भाषणात मर्दूमकी झाडणे कितीही सोपे असले तरिही हिंदूत्वासाठी मर्दपणे भूमिका घेणे खूप कठीण असते. सत्तेसाठी लाचार झालेल्या षंढांना ते कदापी शक्य नाही हे गेल्या वर्षभरात सिद्ध झाले आहे. गजराच्या घडाळ्याच्या तालावर नाचणारी शिवसेना ही सर्वार्थाने स्वाभिमान हरवलेल्या मढ्यांची शवसेना झाली आहे.

२०१९ लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी शिवसेनेने ‘पहले मंदिर फिर सरकार’ अशी घोषणा दिली होती. ‘बाबरी ढाचा पाडणारी शिवसेनाच होती’ इथपासून ते ‘राम मंदिर हे सेनेच्याच प्रयत्नांनी शक्य झाले’ अशी मांडणी करत शेजाऱ्याच्या पोराचा बाप म्हणून मिरवण्याचा प्रयत्न शिवसेनेने अनेकदा केला. पण त्याच राम मंदिराच्या निधी संकलनाचे बॅनर फाडण्याचे आणि निधी संकलनाला अटकाव करण्याचे प्रकार याच शिवसेना सरकारतर्फे होत आहेत.

शिवसेनेच्या याच सत्ताकाळात काँग्रेसच्या शिदोरी मासिकातून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करण्यात आला. पण स्वतःला वाघ म्हणवणाऱ्यांची सध्या काँग्रेससमोर पण शेळी झाली असल्यामुळे याविरोधात आवाजही फक्त भारतीय जनता पक्षानेच उठवला. अर्थात जो माणूस सत्तेसाठी स्वतःच्या वडिंलांचे ‘हिंदूहृदयसम्राट’ ही बिरूद जाऊन त्याचे ‘जनाब’ झालेले सहन करू शकतो, त्यांच्याकडून स्वातंत्र्यवील सावरकरांना ‘माफिवीर’ म्हटल्यावर काही भूमिका घेण्याची अपेक्षाच करू शकत नाही.

सत्तेच्या नादात शिवसेना बेगडी सेक्युलरिझमच्या वाटेवर इतकी पुढे निघून गेली आहे की इथुन मागे वळणे निव्वळ अशक्य आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

एक कमेंट

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा