सत्ता गमावण्याच्या भीतीपोटी शिवसेनेकडून मुंबई महानगर पालिकेत वॉर्ड रचना

सत्ता गमावण्याच्या भीतीपोटी शिवसेनेकडून मुंबई महानगर पालिकेत वॉर्ड रचना

“निवडणूका तोंडावर असताना सत्ताधारी शिवसेनेच्या दबावाखाली महापालिकेने घाईगडबडीत वॉर्ड पुनर्रचनेचा सदोष आराखडा निवडणूक आयोगाला सादर केला. यावर हरकती आणि आक्षेप नोंदवणारे निवेदन आज मुंबई भाजपाच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी मदान यांना दिले.” असं ट्विट करत भाजपा आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

“बृहन्मुंबई महानगर पालिकेने जो लँड बाउंड्रीचा मसुदा तयार केलेला आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप आणि घोळ झाल्याचं समोर आलं आहे. निवडणूक विभागाने तयार केलेला मसुदा मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंग चहल यांना दिला. सुमारे २३ आणि २४ तारखेला हा मसुदा दिल्यानंतर चहल यांनी शिवसेनेने बाहेरून नियुक्त केलेल्या एका एजन्सीने तयार केलेला एक सुधारित मसुदा दबाव टाकून अधिकाऱ्यांकडून मंजूर करवून घेतला. २६ तारखेला तो मसुदा राज्य निवडणूक आयोगाला पाठवण्यात आला. या मसुद्यात, बेकायदेशीरपणे जनगणनेच्या माहितीतून मोठ्या प्रमाणावर पश्चिम उपनगरात फेरफार केलेला आहे. शहरात केला नाही, पूर्व उपनगरात केला नाही परंतु पश्चिम उपनगरमध्ये केला.” असं भाजपा आमदार अमित साटम यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं.

हे ही वाचा:

आर्यन खानला पाळाव्या लागणार ‘या’ १४ अटी

गुरुग्राममध्ये रस्त्यावरील नमाजावरून राडे

त्रिपुरामध्ये कोणतीही मशीद जाळली नाही

उत्तरप्रदेशात या सात पक्षांची भाजपाला साथ

“त्यामुळे राज्य निवडणूक आयुक्त युपीएस. मदान यांची भाजपाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक कोणत्याही प्रकारच्या दबावाशिवाय, प्रामाणिकपणे पार पडावी अशी मागणी आज आम्ही केली. त्याचबरोबर हा बेकायदेशीर मसुदा जर राज्य निवडणूक आयोगाने स्वीकारला तर भाजपाचे सर्व आमदार हे हंगर स्ट्राईकवर त्यांच्या कार्यालयामध्ये बसतील आणि मोठ्या प्रमाणावर जनतेचं आंदोलन हे शिवसेनेच्या धोरणाविरुद्ध मुंबईत उभं केलं जाईल असंही आम्ही त्यांना सांगितलं. आमचा असा सवाल आहे की, मुंबई महानगर पालिकेची सत्ता आपल्या हातून जाईल म्हणून शिवसेनेकडून जाणीवपूर्वक असे बदल वॉर्डांमधे केले जात आहेत का? असं असेल तर आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो.” असंही ते म्हणाले.

Exit mobile version