महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यासोबत सत्ता स्थापन केलेली शिवसेना आता उत्तर प्रदेशमध्ये निवडणुक लढवण्याच्या तयारीत आहे. इतर राज्यातील निवडणुकात एकही उमेदवार निवडून आलेला नसताना आता उत्तर प्रदेशात अयोध्येत योगी आदित्यनाथ यांना शिवसेनेने टक्कर देण्याचे ठरवले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.
संजय राऊत यांनी नुकतीच किसान आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली होती. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे अयोध्येतून निवडणूक लढवण्याची चर्चा आहे. शिवसेनाही अयोध्येत आपला उमेदवार देणार आहे. मथुरेतून शिवसेना प्रचाराला सुरुवात करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशमधून ५० जागा लढवणार असल्याचेही ते म्हणाले. शिवसेनेला उत्तर प्रदेशमध्ये आपलं आस्तित्व दाखवायचं आहे. मला खात्री आहे यावेळी आम्ही ज्या पद्धतीनं लढायचं ठरवलं आहे, त्यामुळे आमचे सदस्य उत्तरप्रदेश विधानसभेत असतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा:
मंत्री हाकणार ‘किल्ल्यांवरून’ कारभार
…आणि तिने बसचे स्टेअरिंग हाती घेत वाचवले प्रवाशांचे प्राण! नेमके घडले काय?
इतर राज्यात एकही उमेदवार निवडून न आलेली शिवसेना उत्तर प्रदेशमध्ये मात्र थेट योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याच्या तयारीत दिसून येत आहे. गोव्यात मात्र, शिवसेना काँग्रेसकडे एकत्र लढण्यासाठी प्रस्ताव देत आहे. ‘आम्ही गोव्यात काँग्रेसने कधीही न जिंकलेल्या जागा मागितल्या आहेत. एकत्र लढलो नाही तर काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये सुद्धा येणार नाही. त्यामुळे आमच्यासारखे काही प्रमुख पक्ष काँग्रेसला आधार द्यायचा प्रयत्न करत आहेत,’ असे वक्तव्य संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.
उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुका सात टप्प्यात पार पडणार आहेत. मणिपूर येथील निवडणुका दोन टप्प्यात तर पंजाब, गोवा, उत्तराखंड राज्याच्या निवडणुका एकाच टप्प्यात पार पडणार आहेत.