कॅन्सर रुग्णालयावरून शिवसेना विरुद्ध जितेंद्र आव्हाड

कॅन्सर रुग्णालयावरून शिवसेना विरुद्ध जितेंद्र आव्हाड

म्हाडाच्या १०० सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याच्या गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयाला शिवडीचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांनी विरोध केला. तशी तक्रार त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आव्हाडांच्या या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे राजकीय वर्तुळात त्याचे पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर करी रोड परिसरातील सुखकर्ता को. हाऊसिंग सोसायटीकडून एक होर्डिंग लावण्यात आलं आहे. त्यावर मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शिवसेनेचा दणका असं ठळक अक्षरात लिहिण्यात आलं आहे. ठाकरे सरकारमध्ये सर्व काही आलबेल आहे असं कालच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितल्यावर आज हा प्रकार पाहायला मिळत आहे.

सुखकर्ता को. हाऊसिंग सोसायटी तर्फे एक होर्डिंग लावण्यात आलं आहे. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि स्थानिक आमदार अजय चौधरी यांचे आभार मानण्यात आलेत. तर मंत्री जितेंद्र आव्हाड यांना शिवसेनेचा दणका, असं ठळक अक्षरात लिहिण्यात आलंय. सुखकर्ता हाऊसिंग को. सोसायटी आणि विघ्नहर्ता हाऊसिंग सोसायटी मधील रहिवाशांना विश्वासात न घेता, टाटा कॅन्सर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी १०० सदनिका देण्याच्या आव्हाड यांच्या निर्णयाला मुख्यमंत्र्यांकडून स्थगिती देण्यात आली आहे. त्यावरुन ही पोस्टरबाजी करण्यात आलीय.

म्हाडाच्या १०० सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाला. त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी माहिती दिली होती. कॅन्सर रुग्णांच्या नातेवाईकांसाठी १०० सदनिका देण्यात येत आहेत. शिवडीतील काही स्थानिकांनी विरोध केल्याचं आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला बोलावून घेतलं आणि सांगितलं की, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. १५ मिनिटात निर्णय झाला. बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.

हे ही वाचा:

ठाकरे सरकार सत्तेच्या नशेत धुंद

आयपीएल २०२२ मध्ये १० संघ खेळणार

आरबीआची चार बड्या सहकारी बँकांवर मोठी कारवाई

विधानसभा अध्यक्ष कधी निवडणार?

त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारमध्ये कुठलाही विसंवाद नाही. विसंवाद असता तर २४ तासाच्या आत निर्णय झाला नसता. मला आनंद याचा आहे की, त्याच परिसरात जागा देऊ शकलो, असं आव्हाड म्हणाले होते. दरम्यान, कॅन्सर हॉस्पिटलला दिलेल्या सदनिकांना निर्णय स्थगित केल्यानंतर या मुद्द्यावरुन महाविकास आघाडीत सत्तासंघर्ष सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. तसंच सर्वसामान्य नागरिकांकडूनही या स्थगितीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळालं.

Exit mobile version