फडणवीसांचे वादळ अडविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

फडणवीसांचे वादळ अडविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न

शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ‘वर्क फ्राॅम होम’ मध्ये व्यस्त असताना त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते मात्र दौरा करणाऱ्या विरोधी पक्ष नेत्यांचा ताफा अडवताना दिसत आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे १ जून रोजी जळगाव दौऱ्यावर गेले आहेत. त्यावेळी फडणवीस यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न स्थानिक शिवसैनिकांकडून करण्यात आला. पिक विमाच्या मुद्द्यावरून हा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला गेला.

मान्सून पूर्व वादळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात पिकांचे आणि घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर आणि रावेर या दोन तालुक्यांना प्रामुख्याने या पावसाचा फटका बसला आहे. या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार, १ जून रोजी आपल्या जळगाव दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून घेतल्या.

हे ही वाचा:

‘कारुळकर’ बनले वर्ल्ड कम्युनिकेशन फोरमचे सदस्यत्व मिळविणारे पहिले भारतीय दांपत्य

मीरा चोप्रा लसीकरण प्रकरण, कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची भाजपाची मागणी

मुंबई महापालिका निवडणुका होणार! निवडणूक आयोगाचा हिरवा कंदिल

काँग्रेस नेत्याची आता थेट भोसले राजघराण्याकडून वसूली

पण देवेंद्र फडणवीस यांच्या या दौऱ्यादरम्यान त्यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न राज्यातील प्रमुख सत्ताधारी शिवसेना पक्षाकडून करण्यात आला. पिक विमाच्या मुद्द्यावरून जळगाव मधील शिवसेना कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तरिही त्यात त्यांना यश आले नाही. पण यावरून आता सत्ताधारी शिवसेनेच्या वर्तनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घरी बसून असतात असा आरोप त्यांच्यावर कायमच होत असतो. ‘तौक्ते’ वादळाच्या नुकसानी नंतर मुख्यमंत्र्यांनी कोकणचा केलेला तीन तासांचा दौरा चांगलाच गाजला होता. मुख्यमंत्र्यांनी केवळ एक औपचारिक दौरा केल्याची टीका चहुबाजूंनी झाली होती. जळगाव आणि इतर महाराष्ट्राच्या नुकसानाची पाहणी करायला मुख्यमंत्री फिरकलेही नाहीत. अशा परिस्थितीत जनतेला भेटायला पोहोचलेल्या विरोधी पक्ष नेत्यांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न म्हणजे राजकीय हेतूने केलेले आंदोलन असल्याचे म्हटले जात आहे.

Exit mobile version