शिवसेनेचा ‘जय बांगला’

शिवसेनेचा ‘जय बांगला’

शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी शिवसेना २०२१ ची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे रविवारी अधिकृतपणे घोषित केले. “शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून शिवसेनेने पश्चिम बंगालची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.” संजय राऊत यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्याची ही शिवसेनेची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी २०१९ ची लोकसभा निवडणूक आणि २०१६ ची विधानसभा निवडणूक सुद्धा शिवसेनेने पश्चिम बंगालमधून लढवली होती.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने १५ जागा लढवल्या होत्या. तामलुक, मिदनापूर, उत्तर कोलकाता, पुरुलिया, बर्राकपूर, मिदनापूर, बांकुरा, जादवपूर इत्यादी १५ जागांवर निवडणूक लढवली होती. परंतु सर्व १५ जागांवर शिवसेनेची अनामत रक्कम जप्त झाली होती. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीतदेखील शिवसेनेने १८ जागा लढवल्या होत्या. पण कोणत्याही जागेवर त्यांना यश मिळाले नाही.

शिवसेना पश्चिम बंगालची विधानसभा निवडणूक लढवणार असा अंदाज २०२० च्या बिहार निवडणुकांनंतर येत होताच. कारण अनेक वेळा शिवसेनेचे नेते तशी विधाने करत होते.

भाजपा या निवडणुकीत ममतांना सत्तेतून दूर करू पाहत आहे तर तृणमूल काँग्रेस हा पक्ष सत्ता टिकवण्याच्या प्रयत्नात आहे. त्याचबरोबर दवे पक्ष आणि काँग्रेसने देखील युती केली आहे. हे ४ मोठे पक्ष वगळता असदुद्दीन ओवैसी यांनी बंगाल दौरा केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ओवैसी आणि ममता दोन्ही नेते मुसलमान मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी रिंगणात आहेत.

या सगळ्या गदारोळात शिवसेनेनी घेतलेली उडी ही पश्चिम बंगाल निवडणुकीच्या दृष्टीने कितपत महत्वाची असेल हाच सवाल आहे.

Exit mobile version