उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली घोषणा
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची पत्रकार परिषदेत घोषणा केली आहे. खासदारांनी माझ्यावर दौपदी मुर्मू यांच्या पाठिंब्यासाठी कोणताही दबाव टाकला नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले होते. खासदारांना मुर्मू यांना पाठींबा देण्यास सांगा, असे त्या पत्राद्वारे उद्धव ठाकरे यांना शेवाळे यांनी आवाहन केले होते. त्यांनतर उद्धव ठाकरे मुर्मू यांना पाठिबा देणार की नाही,अशी चर्चा सुरु होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुर्मू यांना पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.
पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यात काही बातम्या विचित्र पद्धतीने पसरल्या आहेत. काल खासदाराची बैठक झाली आणि त्यात कोणीही माझ्यावर दबाव आणला नाही. उलट मला खासदारांनी सांगितलं की, राष्ट्रपती पदासाठी कुणाला पाठींबा द्यायचा हे तुम्ही ठरवा आणि तुम्ही सांगाल तस आम्ही करू. म्हणून देशाचा विचार करून द्रौपदी मुर्मूंना यांना पाठिंबा देत असल्याचे ते म्हणाले आहेत. पक्षापेक्षा देशहित लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचेही उद्धव यांनी स्पष्ट केले आहे.
पुढे ते म्हणाले, अनेक शिवसैनिकांनी मला विनंती केली. राज्यात ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे. त्याप्रमाणे मी मुर्मू यांना विरोध करायला हवा होता. कारण त्या भाजपाच्या उमेदवार आहेत. मात्र, मी छोट्या मनाचा नाही. आदिवासी महिला म्हणून मुर्मू यांना पाठिंबा देत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले. एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होत असेल तर आपल्याला आनंद आहे असेही ते म्हणाले आहेत.
हे ही वाचा:
एमआयएमचे शंभरहून अधिक कार्यकर्ते देणार राजीनामे
केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर बॉम्बफेक
कर्जाची परतफेड करणाऱ्या अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’!
उद्धव ठाकरेंना धक्का; सदा सरवणकरांचा विभागप्रमुखपदाचा राजीनामा
याधीही बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठींबा दिला होता. तसेच प्रणव मुखर्जी यांनाही शिवसेनेने राष्ट्रपती पदासाठी पाठींबा दिला होता. त्यामुळे देशाचा विचार करून शिवसेना द्रोपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर करत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.