महिला शिवसैनिकांनी शिवसेना शहर प्रमुखाला झोडपले

महिला शिवसैनिकांनी शिवसेना शहर प्रमुखाला झोडपले

भाईंदर शिवसेना शहर प्रमुख पप्पू भिसे यांना काही महिला शिवसैनिकांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. पक्षांतर्गत वादामुळे या महिला शिवसैनिकांनी पप्पू भिसे यांना मारहाण केल्याचे समोर आले आहे. महिला शहर संघटक वैदही परुळेकर आणि काही महिला शिवसैनिकांनी भिसे यांना मारहाण केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या. मात्र, त्यावर आक्षेप घेतल्याने शिवसेनेचे आमदार आणि मीरा- भाईंदरचे संपर्क प्रमुख प्रताप सरनाईक यांच्याकडून नियुक्त्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे अनेक वरिष्ठ शिवसैनिकांमध्ये नाराजी पसरली. या रद्द झालेल्या नियुक्त्यांमध्ये वैदही परुळेकर यांचेही नाव होते.

भाईंदर पश्चिमेच्या शहर प्रमुखपदी पप्पू भिसे यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काही शिवसैनिकांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर रविवार, १७ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास वैदही परुळेकर या शिवसेना शाखेत आल्या. त्यावेळी पदाधिकारी यांच्या खुर्चीवर बसल्या असता शहरप्रमुख पप्पू भिसे यांनी त्यांना विरोध केला. त्यानंतर शाब्दीक चकमक झाली आणि वैदही परुळेकर निघून गेल्या. मात्र, थोड्यावेळाने तीन- चार महिलांसोबत त्या शाखेत आल्या आणि पप्पू भिसे यांची कॉलर पकडून बाहेर आणून मारहाण केली.

हे ही वाचा:

मुंबईच्या आरे कॉलनीत कळस यात्रेत हिंसाचार

अमरावतीत हिंसाचार; कलम १४४ लागू 

नाशिक पोलीस आयुक्तांचा इशारा; भोंग्यासाठी परवानगी घ्या अन्यथा….

… म्हणून WHO चे महासंचालक येणार भारत दौऱ्यावर

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी शहरप्रमुख पप्पू भिसे यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तर भिसे यांच्या तक्रारीवरून परुळेकर यांच्याविरोधात मारहणीची ही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुटराव पाटील यांनी दिली आहे.

Exit mobile version