जलेबी फाफडा खाऊन पोटभरल्या नंतर आता तो पचवण्यासाठी शिवसेना रासगरबा खेळणार आहे. मुंबई महानगरपालिक निवडणूक वर्षभराच्या अंतरावर असताना गुजराती मतांना पदरात पाडून घेण्यासाठी शिवसेना चांगलीच प्रयत्नशील आहे. ७ फेब्रुवारी रोजी शिवसेनेने रासगरब्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुंबईतील काही गुजराती नागरिक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सगळेच पक्ष कंबर कसून मैदानात उतरले आहेत. सत्ताधारी शिवसेनाही यात मागे नसून पारंपारिक मतदारांव्यतिरिक्त नव्या मतदारांना जवळ करण्यासाठी नवे प्रयोग करत आहे. मराठी माणसाचे नाव घेऊन राजकारणात सक्रिय झालेली शिवसेना आता गुजराती मतांच्या मागे आहे. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी शिवसेनेने ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ ही घोषणा देत गुजराती समाजाचा मेळावा आयोजित केला होता. त्यांनतर आता सेनेने रासगरब्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. मालाडच्या सिल्वर ओक हॉटेलच्या सभागृहात हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
एकीकडे आपल्या मुखपत्रातून गुजराती समाजावर टीका करणारी शिवसेना दुसरीकडे गुजराती मतांसाठी मात्र कायमच पुढे येताना दिसते. या आधी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात ‘केम छो वरळी’ असे गुजराती बॅनर्स लावण्यात आले होते.