सायंकाळी ५ पर्यंत बैठकीला उपस्थित राहा! शिवसेनेचा आमदारांना इशारा

सायंकाळी ५ पर्यंत बैठकीला उपस्थित राहा! शिवसेनेचा आमदारांना इशारा

शिवसेनेचे नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४० आमदारांसह प्रथम गुजरात आणि नंतर गुवाहाटी गाठल्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. आपण शिवसेनेतच असल्याचे सांगून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर या सगळ्या आमदारांवर कारवाईचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. या आमदारांनी २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता बैठकीत सहभागी न झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.

शिवसेनेच्या सर्व आमदारांना हे पत्र पाठविण्यात आले असून शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीची ही सूचना आहे. त्यात म्हटले आहे की,  सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असून राज्यातील राजकीय परिस्थिती लक्षात घेता या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी २२ जून रोजी सायंकाळी ५ वाजता तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेत नोंदणी करण्यात आलेल्या ईमेलवरही ही नोटीस पाठविण्यात आली असून व्हॉट्सऍप व एसएमएसद्वारेही ही सूचना कळविण्यात आली आहे. या बैठकीस उपस्थित न राहण्याबद्दल ठोस आणि अधिकृत कारणे सांगितल्याशिवाय तिथे गैरहजर राहता येणार नाही.

आपण या बैठकीस उपस्थित न राहिल्यास आपण स्वेच्छेने शिवसेना पक्ष सोडण्याचा तुमचा इरादा स्पष्ट आहे असे म्हणता येईल परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात असलेल्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. शिवसेनेचे विधिमंडळ पक्षाच्या मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी यांच्या स्वाक्षरीने हे पत्र सर्व आमदारांना पाठविण्यात आले आहे.

हे ही वाचा:

‘जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल’

आदित्य ठाकरेंची रामराज्याची प्रार्थना फळली!

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला

संजय राऊत यांनी सांगितले, सरकारचा कारभार आटोपला

 

एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानपरिषदेची निवडणूक पार पडल्यावर गुजरातमधील सूरत येथे प्रयाण केले. त्यांच्यासोबत प्रारंभी ११-१२ आमदार असल्याचे म्हटले जात होते. नंतर हे प्रमाण ४० पर्यंत पोहोचले. तेव्हा राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली. आता हा गट आपणही शिवसैनिक असल्याचे म्हणत असून आम्ही बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार आहोत, असे म्हणतो आहे.

Exit mobile version