नितेश राणे यांच्या अटकेची मागणी

नितेश राणे यांच्या अटकेची मागणी

कणकवलीत काही दिवसांपूर्वी एका शिवसैनिकावर हल्ला झाला होता याप्रकरणावरून सिंधुदुर्गात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांना या प्रकरणी अटक करावी अशी मागणी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केली आहे. वैभव नाईक यांनी ही मागणी करण्यासाठी सोमवारी २७ डिसेंबर रोजी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. संतोष परब याच्यावरील हल्ल्याचे सूत्रधार नितेश राणे आणि गोट्या सावंत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

सोमवारी शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी कणकवली पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून पोलिसांना नितेश राणेंना अटक करण्यात यावी असे निवेदन दिले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकारपरिषदेत म्हटले की, याप्रकरणात नितेश राणे यांना गोवले जात आहे. काय केलय नितेश राणेंनी? काही संबंध नसताना केवळ सूडाच्या भावनेतून त्यांच्यावर आरोप केले जात आहेत. येणाऱ्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा पराभव होईल म्हणून सूडाच्या भावनेतून कारवाई होऊ शकते, असे नारायण राणे यांनी म्हटले.

हे ही वाचा:

विजय वडेट्टीवारांकडून छत्रपती शिवरायांचा अपमान

सोबत पुरुष असेल तरच महिलांना प्रवास; तालिबान्यांचा फतवा

जालन्यातील १२ कुटुंबांची हिंदू धर्मात घरवापसी

बिग बॉस मराठीचा विजेता विशाल निकम आहे तरी कोण?

१८ डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

Exit mobile version