शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० पेक्षा अधिक आमदार बाहेर पडल्यानंतर त्यावर दिवसेंदिवस राजकारण रंगू लागले आहे. रोज केल्या जाणाऱ्या वक्तव्यांमुळे ठाकरे कुटुंबीय आणि या आमदारांमधील दुरावा वाढत चालला आहे. आता तर कार्यालयांमधील उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांचे फोटोही हटविले जात आहेत.
शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी औरंगाबाद येथील आपल्या कार्यालयातील उद्धव ठाकरे यांचा फोटो हटविला आहे. तो फोटो हटवून तिथे त्यांनी एकनाथ शिंदे यांचा फोटो लावला आहे.
औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांच्या या कार्यालयाचे उद्घाटन उद्धव ठाकरे यांनीच केले होते. कार्यालय अगदी विमानासारखे आहे अशी प्रतिक्रिया तेव्हा उद्धव ठाकरे यांनी दिली होती. तेव्हा त्यांचा फोटो या कार्यालयात होता. पण आता परिस्थिती बदलल्यावर हा फोटो दिसेनासा झाला आहे. तिथे एकनाथ शिंदे यांचा फोटो आला आहे.
हे ही वाचा:
८००० वर्षांपूर्वीची संस्कृती; सौदी अरेबियाच्या वाळवंटात सापडले प्राचीन मंदिर
…आणि पृथ्वी स्वतःभोवती जोरात फिरली!
हिंदू देवीदेवतांची विटंबना करणाऱ्या अंधारेंना तुम्ही उपनेतेपद देता!
राऊत यांच्या अटकेबद्दल बाळासाहेब ठाकरेंच्या चालकाने वाटले पेढे!
या कार्यालयात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो मात्र आहे.आनंद दिघे यांचाही फोटो आहे. याबद्दल शिरसाट म्हणतात की, आदित्य ठाकरेंचा फोटो माझ्या कार्यालयात कधी नव्हताच फक्त उद्धव ठाकरेंचा होता. पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसोबत काम करतो आहे, तेव्हा त्यांचा फोटो लावला आहे. पण शिवसेनाप्रमुखांचा फोटो हलणार नाही. त्यांनी आम्हाला मोठे केले. दिघे साहेबांना आम्ही मानतो. आमच्यावर टीका करताना गद्दार, बंडखोर अशी रोज हेटाळणी करत असाल तर उद्धव ठाकरे यांचा फोटो कसा लावणार? ते जेव्हा चांगले बोलतील तेव्हा त्यांचा फोटो पुन्हा लागेल.
दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले खासदार राहुल शेवाळे यांच्या नवी दिल्लीतील कार्यालयातील उद्धव व आदित्य ठाकरे यांचे फोटो मात्र कायम आहेत.