आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांच्याशी असलेला शिवसेनेचा संघर्ष अद्याप संपलेला नाही. नवनीत राणा यांनी जामीन मिळाल्यानंतर लिलावती रुग्णालयात उपचार घेतल्यावर तेथे एमआरआय करताना काढण्यात आलेल्या फोटोवरून शिवसेनेने लिलावतीत जाऊन दादागिरी केली. शिवसेनेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार मनिषा कायंदे यांनी रुग्णालयात आरडाओरडा करत या फोटो प्रकरणाला कोण जबाबदार आहे, याचा जाब विचारायला सुरुवात केली. मीडियाला तिथे बोलावून त्यांनी जबरदस्त राडा केला.
नवनीत राणा यांनी जामीन मिळाल्यावर मणक्याला दुखापत झाल्यानिमित्ताने लिलावतीत उपचार घेतले. तिथे त्यांची एमआरआय चाचणी करण्यात आली. त्याचे काही फोटो व्हायरल झाले. त्यावरून शिवसेनेच्या नेत्यांनी रुग्णालयाला जबाबदार धरत लिलावती रुग्णालयात धिंगाणा घातला. रुग्णालयात मीडियाला बोलावून त्यांच्यासमोरच डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉय किंवा तिथल्या कर्मचाऱ्यांना त्यांनी जाब विचारायला प्रारंभ केला. हे फोटो कुणी काढले, तो स्टाफ कुठे आहे, तेव्हा कोण कोण एमआरआय विभागात उपस्थित होते, राणा यांना मणक्याचा त्रास असताना त्यांनी एमआरआय मशिनच्या जवळ झोपलेल्या असताना डोके वर कसे उचलले, त्यांच्या शरीराला पट्टा का बांधण्यात आला नाही, असे प्रश्न डॉक्टर, नर्सेसना विचारून त्यांची उलटतपासणी करण्याचा प्रयत्न केला.
हे ही वाचा:
‘उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची ट्युशन घ्यावी’
मुंबई-पुणे महामार्गावर अपघात, तीन मृत्यू
नार्कोटिक्स ब्युरोची पाळेमुळे विस्तारणार
सोमय्या सहकुटुंब पोलिस ठाण्यात; संजय राऊतांविरोधात तक्रार
राणा दांपत्याचा राग त्यांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर काढला. शिवसेनेच्या या महिला नेत्यांसोबत युवा सेनेचे नेते, शिवसैनिकही तिथे हजर होते. प्रसारमाध्यमांनाही खास तिथे बोलावण्यात आले आणि त्यांच्यासमोरच टेबलवर बसून त्यांनी सगळ्या स्टाफला, डॉक्टरांना बोलावले आणि त्यांची हजेरी घेतली. त्यावरून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणात कुणाची चूक असेल तर वरिष्ठांकडे तक्रार करून त्यांना याची जाणीव करून देता आली असती पण प्रसारमाध्यमांसमोर सर्वांची उलटतपासणी करण्याचा अधिकार या नेत्यांना कुणी दिला, असा सवाल लोक विचारू लागले आहेत.