संजय राऊत यांची ‘साडेतीन’ फिल्म ठरली फ्लॉप!

संजय राऊत यांची ‘साडेतीन’ फिल्म ठरली फ्लॉप!

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून अखेर काहीही हाती लागले नाही. किरीट सोमय्या यांच्यावर वैयक्तिक आरोप करण्यापलिकडे ठोस असे राऊत यांना या पत्रकार परिषदेत काही सांगता आले नाही. त्यामुळे मंगळवारी सकाळपासून खूप मोठा स्फोट संजय राऊत घडवणार, अशी चर्चा असताना प्रत्यक्षात मात्र ही पत्रकार परिषद म्हणजे निव्वळ फुसका बार ठरला.

संजय राऊत यांनी संध्याकाळी ४ वाजता पत्रकार परिषद घेऊन भाजपाच्या साडेतीन लोकांना तुरुंगात पाठवणार असल्याची भाषा करत होते पण जवळपास तासभर झालेल्या या पत्रकार परिषदेत त्यांना अशी साडेतीन माणसे जाहीर करता आली नाहीत. उलट आपण आणखी माहिती यानंतरही देऊ एवढेच ते म्हणाले.

सुरुवातीच्या २० मिनिटांत त्यांनी भाजपावर आणि राष्ट्रीय तपास यंत्रणांवर तोंडसुख घेतले आणि महाराष्ट्र, मराठी माणूस घाबरणार नाही. गांडुंची अवलाद नाही, असे ठाकरी शैलीत सांगितले. राऊत म्हणाले की, काही दिवसांपासून आपण पाहात आहात की, शिवसेना, ठाकरे परिवार, आनंदराव अडसूळ असतील. अनिल परब, भावना गवळी, राष्ट्रवादीचे पवारांच्या कुटुंबियांपासून सगळ्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा हल्ले करत आहेत हे देशावरचे संकट आहे. महाराष्ट्रावरच नाही तर असे पश्चिम बंगालवरही संकट आहे. महाराष्ट्राचे सरकार त्यांना पाडायचे आहे. या यंत्रणांचा गैरवापर सुरू आहे. खोटे आरोप बदनाम्या, दबाव एकतर गुडघे टेका नाहीतर सरकार आम्ही घालवू अशा धमक्य़ा सतत दिल्या जात आहेत.

राऊत यांनी सुरुवातीला तपास यंत्रणांवर टीका केली. पण ज्या साडेतीन लोकांची नावे ते उघड करणार होते, ते मात्र त्यांना काही सांगता आले नाही. तरी त्यांनी पीएमसी घोटाळा, राकेश वाधवान, किरीट सोमय्या, मोहित कंबोज असे संबंध जोडत काहीतरी उघड करण्याचा प्रयत्न केला. पण फारसे विस्फोटक असे काही त्यातून बाहेर आले नाही.

ते म्हणाले की, भाजपाचे काही प्रमुख लोक मला भेटले. त्यांनी मला वारंवार हे सांगितले की, कोणत्याही परिस्थितीत हे सरकार घालवायचे आहे. संपूर्ण तयारी झाली आहे. राष्ट्रपती राजवट आणू, काही आमदार हाताशी लागत आहेत. तुम्ही मध्ये पडू नका. उलट मदत करा. मी म्हटले कसे शक्य आहे. १७० आमदारांचे बहुमत कसे उडवू शकता. तुम्ही काही लोकांनी मदत केली नाही. तर तुम्हाला तपास यंत्रणा फिक्स करतील. तेव्हा ते नेते म्हणाले की, तुम्हाला पश्चात्ताप होईल की तुम्ही आम्हाला का मदत केली नाहीत. मी म्हटले हरकत नाही. काहीही करू शकता तुम्ही. पण आम्ही या सरकारला नख लागेल असे कृत्य करणार नाही. सध्या पवार कुटुंबियांवर धाडी पडत आहेत. त्यांनाही आम्ही टाइट करू. दुसऱ्या दिवसापासून पवार कुटुंबियांच्या घरावर धाडी पडू लागल्या. ईडीचे लोक बहिणी, मुलींच्या घरात ८-८ दिवस ठाण मांडून बसले. अशाच धमक्या देत होते.

राऊत यांनी सांगितले की, पण मी प्रतिकार करू असे म्हटले तर माझ्यावर आणि आसपासच्या लोकांवर ईडीच्या धाडी पडायला सुरुवात झाली. तिसऱ्या दिवशी चार वाजता तीन वाजता. त्याआधी धाड पडण्याआधी मुलुंडचा दलाल आहे तो पत्रकार परिषद घेतो आणि ईडीचे लोक राऊत यांच्या घरी पोहोचणार आहेत. हा काय प्रकार आहे. तुमचे सरकार आले नाही म्हणून तुम्ही यंत्रणांचा वापर करून त्रास देता. तुम्हाला वाटते आम्ही झुकू? पण बाळासाहेबांनी आम्हाला ते शिकवले नाही.

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर आरोप करताना खालच्या भाषेत टीका केली. राऊत यांनी सांगितले की, उद्धवजींनी मला सांगितले की सत्य लोकांसमोर येऊ द्या. मग बघू काय करायचे ते. महाराष्ट्रात कोण राहतंय ते बघू तुम्ही राहात आहात की ते. आमच्या बायकामुलींकडे बघणार हे बाहेरचे लोक हे निर्लज्जपणाचा कळस, या राज्यात असे कधी घडले नव्हते या पद्धतीने राजकारण घडले नव्हते. रोज प्रकरणे काढता. काय तथ्य आहे त्यात.

मग संजय राऊत यांनी म्हटले की, ठाकरे कुटुंबियांनी कोरलाई गावात १९ बंगले बांधून ठेवलेत. ही बेनामी प्रॉपर्टी आहे. माझे आव्हान आहे त्याला दलालाला मी सांगतो की, कधीही सांगा चार बसेस करू आणि १९ बंगल्यावर पिकनिकला जाऊ. जर दिसले बंगले तर मी राजकारण सोडेन. दिसले नाहीत तर त्या दलालाला जोड्याने मारीन.

माझे गाव अलिबाग. माझ्या जमिनीचा तपास ईडी करत आहे. या जमिनीसाठी ईडीने १५ दिवसांपासून गावातील लोकांना विचारणा केली. ३०-४० लाखांच्या पुढे व्यवहार नसेल. पण पहाटे जायचे आणि त्या लोकांना धमकवायचे. तू संजय राऊत यांच्याविरोधात लिहून दे. किती कॅश दिली. १२-१४ तास बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आली. कोणता तपास आहे का, धमक्या देत आहेत. दादागिरी करत आहेत. तिहारच्या जेलमध्ये टाकू. कोणत्या कायद्याने. कोणता तपास चालू आहे, असेही संजय राऊत म्हणाले.

हे ही वाचा:

चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी!

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना ब्लॅकमेल करणाऱ्या दोघांना अटक

भारतीय नागरिकांनाही युक्रेनमधून बाहेर पडण्याचे आदेश

… म्हणून उत्तराखंडमध्ये माजी मुख्यमंत्री हरीश रावत मतदानाला मुकले

 

राऊत यांनी नंतर राकेश वाधवानकडे मोर्चा वळवला. ते म्हणाले की, पीएमसी बँक घोटाळ्यातला आरोपी राकेश वाधवान आहे. बिल्डर आहे तो. फार महत्त्वाची गोष्ट सांगतो. राकेश वाधवानला सगळेच ओळखत होते. त्याच्या खात्यातून २० कोटी रुपये भाजपाच्या खात्यात पक्षनिधी म्हणून गेले होते. हे महाशय बोलत आहेत ईडी वाल्यांनी ऐका. सीबीआयनेही ऐका. किरीट सोमय्या राकेश वाधवान भयंकर माणूस आहे, भ्रष्टाचार केला आहे. लोकांचे पैसे बुडवले आहेत. निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची आहे. किरिटी सोमय्या, नील सोमय्याची आहे. राकेश वाधवानचा तो पार्टनर आहे. निकॉनमधील पैशाची गुंतवणूक करून वसईत त्याने प्रकल्प उभारला आहे. मास्टरमाइंड राकेश वाधवानशी यांचा संबंध आहे. ब्लॅकमेल करून वाधवानकडून कोट्यवधींची जमीन लाडानी याच्या नावावर जमी घेतली. कॅशही घेतली. ८० ते १०० कोटींच्या घरात आहे. जमीन लाडानी

गोखिवरे वसई येथे ४.५ कोटी रुपयांची जमीन घेतली. त्या जमिनीवर जी कंपनी आहे त्याचा डायरेक्टर नील किरिट सोमय्या. हे हजारो कोटींचे प्रकल्प उभारले जात आहे. पर्यावरण खात्याची मंजुरी नाही. अनेक नियमांची पायमल्ली केली आहे. त्याला २०० कोटींचा दंड केला जाऊ शकतो. या प्रोजेक्टचे परवाने रद्द करा. सोमय्या पितापुत्राला ताबडतोब अटक करा.

संजय राऊत यांनी हे सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना कळविणार असल्याचे सांगितले. मी याबाबत मोदींनाही कळवणार आहे. अमित शहा यांनाही कळवेन. मग पत्रकारांना सांगेन. नवलानी फरीद शमा, रोमी, फिरोज शमा हे कुणाचे एजंट आहेत. या लोकांनी ३०० कोटी रुपये ६० बिल्डरांकडून घेतले आहे. मी यात किती ईडीचे लोक सामील आहेत हे मी देशाला सांगेन. कुठे खातात, कुठे अय्याशी करतात हे मी सांगणार आहे. मी घाबरणार नाही.

राऊत नंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांवरही घसरले. ते म्हणाले की, मोहित कंबोज देवेंद्र फडणवीसचा फ्रंट मॅन आहे. फडणवीसांना तो बुडवणार आहे. पत्राचाळ वाला इश्यु जो आहे. पत्राचाळची जमीन कंबोजने घेतली आहे. त्यात लक्झरी कंस्ट्रक्शन प्रोजेक्ट सुरू आहे. तो आमच्यावर आक्षेप घेत आहे.

राकेश वाधवान याच्याकडून कंबोजच्या ग्रुपने १२ हजार कोटीची जमीन खरेदी केली आहे. कुणाचा पैसा आहे. तो फडणवीसांचा माणूस आहे.

Exit mobile version