उद्धव ठाकरे यांनी बीकेसी येथील आपल्या मास्टर सभेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेली टीका त्यांना चांगलीच भोवताना दिसत आहे. कारण संघावर केलेल्या टीकेवरून नाराज होत आता शिवसेना पदाधिकारी राजीनामा देत असल्याचे चित्र समोर आले आहे. पुण्यात हा प्रकार समोर आला असून पुण्याचे शिवसेनेचे माजी शहर प्रमुख श्याम देशपांडे यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केलेल्या टीकेमुळे नाराज होत आपण पक्षातून बाहेर पडत असल्याचे देशपांडे यांनी आपला राजीनामा देत म्हटले आहे.
मंगळवार, १७ मे रोजी श्याम देशपांडे यांच्या राजीनाम्याचे पत्र समोर आली आहे. भारतीय जनता पार्टीच्या स्थापने पूर्वीपासून संघ अस्तित्वात आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला राजकारणात ओढण्याची गरज नव्हती असे देशपांडे यांनी म्हटले आहे. तर संघाला राजकारणात ओढून उद्धव ठाकरे यांनी बेगडी धर्मनिरपेक्षतावाद्यांचा पदर घट्ट धरला आहे अशी भावना देशपांडे यांनी व्यक्त केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करून शिवसेनेची हिंदुत्वाची दिशा भरकटली आहे असेही देशपांडे यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
मंदिर पाडून ज्ञानवापी मशीद उभारल्याचा सलमान खुर्शीद यांचा दावा
‘या’ दिवशी अयोध्येतील राम मंदिर होणार भाविकांसाठी खुलं
गुंतवणूकदारांना एलआयसीने केले निराश
१९९३च्या मुंबई साखळी स्फोट प्रकरणी चौघे अटकेत
दरम्यान पुणे महानगरपालिकेची निवडणुक तोंडावर येऊन ठेपली असतानाच श्याम देशपांडे यांनी शिवसेनेला रामराम ठोकणे हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. देशपांडे यांच्या राजीनाम्याच्या फटका आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला बसेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर येणाऱ्या काळात श्याम देशपांडे आपली राजकीय दिशा काय निश्चित करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशपांडे कोणत्या पक्षात प्रवेश करतात हे बघणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.