भाजपाशी जुळवून घ्या…प्रताप म्हणे!

भाजपाशी जुळवून घ्या…प्रताप म्हणे!

गेले अनेक दिवस गायब असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी रविवारी धमाकेदार एन्ट्री घेतली आहे. सरनाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून एक खुले पत्र लिहिले आहे. या पत्रातून प्रताप सरनाईक यांनी भाजपासोबतच्या युतीसाठी बॅटिंग केली आहे. तर त्याचवेळी महाविकास आघाडीतील सहकारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. सरनाईकांच्या या पत्रामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

ठाण्यातील ओवळा माजिवडा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक गेल्या काही महिन्यांपासून आऊट ऑफ रिच होते. पण रविवार, २० जून रोजी सरनाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खुले पत्र लिहीत कमबॅक केला आहे. आपल्या या पत्रातून सरनाईक यांनी महाविकास आघाडीतील सहकारी पक्षांवरच निशाणा साधला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आपल्या पक्षातील लोकांना फोडत असल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे. सरनाईक यांच्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकासआघाडीमध्ये सारे काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

हे ही वाचा :

सरकारचा अजब कारभार; कोविड सेंटरमध्ये शिकाऊ वैद्यकीय तज्ज्ञ

हात की सफाई; इकडचा कचरा तिकडे…

लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत!

शस्त्रास्त्र साठ्यासह एकाला केले जेरबंद

महाविकास आघाडी एका विशिष्ट हेतूने झाली असली तरीही काँग्रेस पक्ष एकला चलो रे चा नारा देतोय. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचेच नेते,कार्यकर्ते फोडत आहेत असा खळबळजनक आरोप सरनाईक यांनी केला आहे. तर आपल्या मागे तपस यंत्रणांचा ससेमीरा लागू नये यासाठी महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी हे केंद्रातील सत्ताधारी पक्षासोबत छुपी हातमिळवणी करत आहेत असे सरनाईक यांनी म्हटले आहे. सत्तेत एकत्र राहूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलेच नेते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर अशा परिस्थितीत पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्यासोबत जुळवून घेतलेले बरे, असे आपले वैय्यक्तिक मत असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.

तर पुढील वर्षी मुंबई, ठाणे, पुणे व अन्य महापालिकांच्या निवडणुका आहेत. राज्यात युती तुटली असली तरीही अनेक ठिकाणी स्थानिक पातळीला युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा तसाच आहे. हे अजून तूटण्याआधी जुळवून घेतलेले बरे. त्याचा फायदा आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना आणि शिवसेनेला भविष्यात होईल असे सरनाईक यांनी या पत्रात म्हटले आहे.

एकीकडे शिवसेनेच्या वर्धापन दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वबळाची भाषा केलेली असताना प्रताप सरनाईक भाजपा सोबतच्या युतीसाठी आग्रह का करत आहेत असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्याऐवजी सरनाईक यांनी खुले पत्र लिहिण्याचा पर्याय का स्विकारला? हा ही प्रश्न विचारला जात आहे.

Exit mobile version