क्रूझवरील ड्रग्स पार्टी प्रकरणात अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली होती. आर्यन खान अटक प्रकरणात आता शिवसेनेचे नेते सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. शिवसेना नेते किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून आर्यन खानच्या सुटकेची मागणी केली आहे. तसेच एनसीबीच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
किशोर तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात ई- मेलद्वारे याचिका दाखल केली असून त्यांची याचिका दाखल करून घेण्यात आली आहे. एकीकडे तीन हजार किलो अमलीपदार्थ मिळतात. मात्र, मुंबई किंवा बॉलिवूडचीच एनसीबी बदनामी करत आहे. एनसीबी ही स्वतंत्र संघटना असून आपल्या पदाचा गैरवापर करत आहे, असे तिवारी यांनी म्हटले आहे. या याचिकेतून आरोपींच्या मूलभूत अधिकारांचा हवाला देण्यात आला आहे.
सिनेसृष्टीतील सेलिब्रिटींना लक्ष्य करुन कारवाई करण्यात आल्याचेही म्हटले आहे. या प्रकरणी सरन्यायाधीशांनी स्वत: लक्ष घालण्याची मागणी शिवसेनेचे नेते किशोर तिवारी यांनी केली आहे. या प्रकरणात एनसीबीच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.
हे ही वाचा:
‘बांगलादेशी हिंदूंचे रक्षण आणि पुनर्वसन करा!’ काँग्रेस नेत्याची मागणी
मंदाकिनी खडसे ईडी समोर आज राहणार हजर
म्हाडासाठी अर्ज करताय? मग तुम्ही मांसाहारी की शाकाहारी ते सांगा
किशोर तिवारी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर संजय राऊत यांनी ‘सीएनएन न्यूज १८’ला प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘या याचिकेचा शिवसेनेशी संबंध नाही. एक पक्ष म्हणून आम्ही किशोर तिवारी यांच्या भूमिकेशी संबंधित नाही आणि ती याचिका शिवसेना पक्षाची नाही.
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे सुद्धा एनसीबीच्या कारवाई विरोधात सातत्याने प्रश्न उपस्थित करत आहेत. दसरा मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनीही सेलिब्रिटींवर होत असलेल्या कारवाईवरून निशाणा साधला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी एनसीबी विरोधात टीकास्त्र सोडले होते.