शिवसेनेचे नेते माजी आमदार अनंत तरे यांचे दिर्घ आजाराने दुःखद निधन झाले आहे. वयाच्या ६७ व्य वर्षी तरे यांनी अखेरचा श्वास घेतला. कोळी समाजाचे नेते अशी अनंत तारे यांची ओळख होती. ब्रेन हॅमरेज त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे.
शिवसेनेचा ठाण्यातील महत्वाचा चेहरा असणारे अनंत तरे यांचे सोमवार दिनांक २२ फेब्रुवारी रोजी निधन झाले. अनंत तरे हे शिवसेनेचे माजी आमदार राहिले असून २००० साली ते विधान परिषदेवर निवडून गेले होते. अनंत तरे यांनी तीन वेळा ठाण्याचे महापौर पदही भूषविले आहे. १९९३ साली, १९९४ साली आणि १९९५ मध्ये अशी सलग तीन वर्ष तरे यांनी ठाण्याचे प्रथम नागरिक म्हणून काम केले आहे. २०१५ सालपासून ते शिवसेना पालघर जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून कामकाज पाहत होते. शिवसेनेच्या मलंगगड मोहिमेत तरे यांची भूमिका खूप मोलाची होती. अनंत तरे हे एकविरा देवस्थानचे अध्यक्ष देखील होते.
हे ही वाचा:
रिक्षा-टॅक्सी भाडेवाडीचा संबंध पेट्रोल दरवाढीशी नाही…ते आधीच ठरले होते
अनंत तरे यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणातील कोळी समाजाचे एक महत्वाचे नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या जाण्याने ठाण्याच्या राजकीय क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता अनंत तरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.