घरबसल्या कारभाराला विटून शिवसेनेच्या ४० आमदारांनी केलेले बंड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जिव्हारी लागले आहे. सामनामध्ये प्रसिद्ध झालेल्या मुलाखतीतून पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला. ही मॅरेथॉन मुलाखत हा सामनातला वार्षिक कौटुंबिक सोहळा असतो. घरचे संपादक, घरगुती मुखपत्र, सोयीचे प्रश्न आणि पाठ थोपटण्याचा कार्यक्रम असे या मुलाखतीचे स्वरुप असते. ताजी मुलाखत ही त्याला अपवाद नव्हती. मुख्यमंत्री पद गमावावे लागले अशा एका वैफल्यग्रस्त नेत्याची मुलाखत यापेक्षा या मुलाखतीचे वेगळे वर्णन होऊ शकत नाही.
जेव्हा एखादा माणूस आपल्या नशीबालाच कर्तृत्व समजायला लागतो, तेव्हा त्याचा ऱ्हास सुरू होतो, अशा प्रकारचे ट्वीट काही दिवसांपूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्याचा रोख अर्थात उद्धव ठाकरे यांच्याकडे होता. उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा व्यक्त होतात, तेव्हा या ट्वीटची आठवण झाल्याशिवाय राहात नाही. शिवसेनाप्रमुखांच्या पोटी जन्म झाला हा उद्धव ठाकरे यांच्या नशीबाचा भाग आहे, कर्तृत्वाचा नाही हे राज ठाकरे यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. पण हे मान्य करणे म्हणजे आपल्या मर्यादा मान्य करणे असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना ते सोयीचे नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा सांगितल्याशिवाय उद्धव ठाकरे यांची मुलाखत पूर्ण होत नाही. वयाची साठी उलटल्यानंतरही मुलाकडे स्वत: बद्दल सांगण्यासारखे काही नसावे, त्याला सतत वडिलांचे नाव सांगावे लागते यातच सर्व आले.
ठाकरे आणि शिवसेनेला वेगळे करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे. माझ्या वडीलांचे नाव चोरण्याचा प्रयत्न होतोय असे ते म्हणाले. नाव वापरण्याचा मुद्दा असेल तर शिवसेनेने स्थापनेपासून छत्रपती शिवरायांचे नाव वापरले. प्रत्येकाने स्वत:च्या बापाचे, आजोबा-पणजोबाचे नाव वापरायचे हा उद्धव ठाकरे यांचा तर्क गृहीत धरला तर छत्रपतींचे नाव वापरण्याचा अधिकार फक्त सध्या हयात असलेले संभाजीराजे आणि उदयनराजे या छत्रपतींच्या वारसांना आहे. २०१४ च्या २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तमाम उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव वापरले होते. मोदी हे वडील होते का? असा सवाल भाजपा नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी केला आहे.
खरे तर नुकत्याच पदावरून पायउतार झालेल्या मुख्यमंत्र्याने अशा मुलाखतीत अडीच वर्षातील कामाची जंत्री विरोधकांच्या तोंडावर फेकायला हवी. परंतु फक्त वसुली आणि टक्केवारी एवढेच गेल्या अडीच वर्षांतील कर्तृत्व असल्यामुळे घरच्या मुलाखतीत, त्याचाच अभाव होता. उद्धव ठाकरे आजही विरोधकांनी घेतल्या घरबशेपणाच्या आक्षेपावर खुलासे देतायत. घरी बसून राहण्याची कारणे सांगतायत.
कोविड होता, म्हणून घरी बसलो होतो, असा खुलासा उद्धव ठाकरे यांना या मुलाखतीत करावा लागला. मीच लोकांना घरी बसायला सांगितले होते, म्हणून मीही घरी बसलो, असेही ते म्हणाले. पण उद्धव ठाकरे जेव्हा घरी बसले होते तेव्हा विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणवीस पायाला भिंगरी लावून महाराष्ट्रभर फिरत होते. ज्येष्ठ नेते शरद पवार लोकांच्या गाठीभेटी घेत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसभरात कित्येक बैठका घेत होते. उद्धव ठाकरे या काळात काय करत होते?
एखादा नेता आजारपणावर बोलतो आणि लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतो हा प्रकार महाराष्ट्राला तरी अगदी नवखा आहे. शरद पवार गेली अनेक वर्षे दुर्धर आजाराशी लढतायत. पवार यांच्या जातीय आणि हिंदूविरोधी राजकारणाबाबत कितीही आक्षेप असले तरी त्यांनी कधीही आजारपणाचे भांडवल करून सहानूभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही याचे कौतूक केल्याशिवाय राहवत नाही.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद हे कर्तृत्व दाखवण्याचे पद आहे. जनतेची सेवा करण्यासाठी राबणारा मुख्यमंत्री या पदावर हवा. जर आजारपणामुळे हे कर्तव्य बजावता येत नसेल तर अशा व्यक्तिने पदावरून पायउतार व्हायला हवे किंवा दुसऱ्यावर हा भार सोपवायला हवा. पण उद्धव ठाकरे यांनी यापैकी काहीही केले नाही. ते केवळ घरी बसून राहिले. त्यामुळे राज्याच्या जनतेला गतिमान प्रशासनाची गरज होती, तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या अकर्मण्यतेमुळे कारभार सुस्त पडला होता. जनतेच्या मनात याबाबत रोष आहे, याची जाणीव असल्यामुळे उद्धव ठाकरे आजारपणाचे कारण सांगून सारवासारव करण्याचा प्रयत्न करतायत. सतत मर्दपणाची भाषा करण्याऱ्यांनी आजारपणाचे किस्से सांगून सहानूभूती मिळवण्याचा प्रयत्न करणे अत्यंत केविलवाणे वाटते.
वैयक्तिक आय़ुष्य आणि सामाजिक जीवन दोन्ही वेगळ्या बाबी आहेत. वैयक्तिक वेदना आणि दु:खाचे प्रसंग कोणाला चुकले आहेत? एकनाथ शिंदे यांच्या पोटची दोन मुलं त्यांच्या समोर पाण्यात बुडाली. परंतु तरीही त्यांनी डोळे पुसून कंबर कसली आणि सार्वजनिक आयुष्यात सक्रीय राहिले. ठाकरे यांच्यापासून फारकत घेणाऱ्या आमदारांची तुलना त्यांनी पालापाचोळा अशी केलेली आहे. दुसऱ्याला कस्पटासमान वागवण्याचा हा प्रयत्न उद्धव ठाकरे यांची सरंजामी मानसिकता दाखवणारा आहे.
हे ही वाचा:
सिव्हील इंजिनिअर डिप्लोमा केलेल्यांना कंत्राटदार नोंदणीसाठी हिरवा कंदील
मध्य प्रदेशातही ‘सर तन से जुदा’चा प्रकार?
शिवसेना म्हणजे ठाकरे अँड सन्स..
‘खोबरे गेले करवंटी हातात राहिली आतातरी शहाणे व्हा’
देशात घराणेशाहीचा पुरस्कार करणारे पक्ष लोकशाहीचे शत्रू आहेत, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्याचे कारण अत्यंत स्पष्ट होते. काही सन्माननीय अपवाद वगळता पक्षाचे दुकान चालवणाऱ्या नेत्यांकडे स्वत:चे कोणतेही कर्तृत्व नसते. पित्याचे नाव घेऊन पक्ष चालवायचा आणि केवळ स्वत:च्या तुंबड्या भरण्याचे एवढेच यांचे कर्तृत्व. उद्धव ठाकरे यांचे कर्तृत्वही यापेक्षा काय वेगळे आहे? तरीही गेली तीन ते चार दशके शिवसेनेसाठी राबणाऱ्यांना पालापाचोळा ठरवून उद्धव ठाकरे यांनी त्याच मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्यासाठी ज्यांनी विधान परिषदेने जाण्याचा आड मार्ग स्वीकारला, ते चार चार टर्म आमदार बनलेल्या नेत्यांना पालापाचोळा ठरवत आहेत.
एकूणच मुलाखतीचा अर्क असा की कोणीही कितीही कर्तृत्ववान असले, कितीही घाम गाळला, कितीही त्याग केला, शिवसेनेचे नेतृत्व करण्यासाठी ठाकरे हे आडनाव असणे अनिवार्य आहे. जसे काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी गांधी हे आडनाव अनिवार्य आहे. त्याने पक्षाचा बाजार उठवला तरी चालेल.
या मुलाखतीत पक्षाचे चिन्ह असलेल्या धनुष्यबाणाबाबत उद्धव ठाकरे बोलले. पण त्यावर चर्चा न करता जाता जाता एक किस्सा सांगतो. स्वातंत्र्यवीर स्मारकात आर्चरीचे वर्ग भरायचे. एक दिवस इथून सुटलेला एक बाण चूकून महापौर बंगल्याच्या परीसरात गेला. नेमके त्यावेळी तिथे उद्धव ठाकरे बसले होते. बाण त्यांच्यापासून काही अंतरावर पडला. पण केवळ एवढ्या कारणासाठी शिवसेनेने पोलिस कारवाई करून स्मारकातील हे आर्चरी प्रशिक्षण बंद करायला लावले. त्यावेळी विश्वनाथ महाडेश्वर हे महापौर होते. ज्यांना बाणाची इतकी भीती वाटते, असे शिवसेनेचे नेतृत्व सध्या धनुष्यबाणासाठी भांडते आहे.
(न्यूज डंकाचे मुख्य संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)