शिवसेनेत ‘राम’ राहिला नाही!

शिवसेनेत ‘राम’ राहिला नाही!

एकीकडे अयोध्येतील राममंदिराच्या उभारणीत नसलेल्या सहभागाविषयी छाती फुगवून सांगायचे आणि त्याच राममंदिराजवळच्या जमिनीच्या खरेदीविक्रीबाबत खोटे, बिनबुडाचे आरोप केले गेले की, त्याविषयी पुढचा मागचा विचार न करता शंका उपस्थित करायची, असे दुतोंडी वर्तन शिवसेनेकडून होत आहे. खरे तर, दीड वर्षांपूर्वी महाविकास आघाडीत शिरल्यानंतर शिवसेनेला अशा अनेक कसरती करण्याशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळेच हिंदुत्व सोडलेले नाही असा आव आणायचा आहे, पण हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद्यांविरोधात बरळणाऱ्या काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या मांडीला मांडी लावूनही त्यांना बसायचे आहे. मुख्यमंत्रीपद मिळविण्याच्या हव्यासापायी शिवसेनेने आता असे दोन्ही दगडांवर पाय ठेवून तोल सांभाळण्याचा अयशस्वी प्रयत्न सुरू ठेवला आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सत्तेचा उपभोग घेणाऱ्या शिवसेनेने सातत्याने भाजपा सरकारवर टीका केली. आम्ही सत्तेत असलो तरी अंकुश ठेवण्याचे काम करतो, राजीनामे आम्ही खिशात घेऊनच फिरत आहोत, अशा बढाया मारणाऱ्या शिवसेनेला आता मात्र सरकारमधील दोन पक्षांवर तोच अंकुश ठेवावासा वाटत नाही. आता राजीनाम्यांचे नावही नाही. ठाकरे सरकारमध्ये सामील असलेला काँग्रेस पक्ष निवडणुकीत स्वबळाची भाषा करतो, मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त करतो, पण शिवसेना मूग गिळून गप्प बसते. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या गळ्यात गळे घालून त्यांना फुकटचे मिळालेले सत्तेचे लोणी चाखायचे आहे.

हे ही वाचा :

टक्केवारीच्या पुलाचा प्रस्ताव फेटाळला

‘शर्मा यांच्यासह काम करणाऱ्या पंटर्सचा मनसुखच्या हत्येत हात’

‘तिसऱ्या लाटेचा धोका सांगता आणि डॉक्टरांची सेवाही खंडित करता’

अखेर प्रदीप शर्मा अटकेत

ज्या दोन पक्षांवर निवडणुकीत कठोर टीका करून मते मिळविली त्याच पक्षांसोबत सत्तेत सहभागी होण्याची नामुष्की शिवसेनेवर आली. आता तर राष्ट्रवादीशी युती करण्याची भाषाही हा पक्ष बोलू लागला आहे. भाजपा स्वबळाची भाषा करतो हे त्यांना पटत नाही. पण त्यासाठी ते स्वतः स्वबळावर लढण्यास तयार नाहीत तर त्यांना आधार हवा आहे, तोही राष्ट्रवादीचा. ज्या पक्षावर भाषणांमधून, मुखपत्रातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जहाल शब्दांत प्रहार केला, आता त्याच पक्षाच्या हातात हात घालून सत्तेचे लोणी मटकाविण्याचा शिवसेनेचा इरादा आहे. कारण स्वबळावर लढणे एकट्याने शक्य नाही, अशी खात्री आता शिवसेनेला वाटू लागली असली पाहिजे. भाजपा तर आता सोबत करणार नाही, काँग्रेसशी सोबत करून पदरात काहीही पडणार नाही. त्यापेक्षा नवा घरोबा करून १००-१५० जागा जिंकण्याचे स्वप्नमनोरे रचले जात आहेत. शिवबंधन काढून घड्याळ बांधण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे.

राम मंदिरच्या जमीन खरेदीविक्री प्रकरणावरून तर कसलीही शहानिशा न करता काँग्रेसच्या सुरात सूर मिसळून हे आरोप जणू खरेच असल्याच्या थाटात शिवसेनेने छाती पिटून घेतली. बातम्या, अग्रलेख लिहून कसा राममंदिर निर्माणात घोटाळा केला जात आहे, याचे चित्र उभे केले गेले. आता त्यात कोणतेही तथ्य नाही, हे समोर आल्यानंतर मात्र त्याविषयी मुखपत्रात अवाक्षर नाही.

राममंदिराबाबत शिवसेनेने जो खोडसाळपणा केला, त्याविरोधात भाजपा युवा मोर्चाने आंदोलन केल्यावर दगडधोंडे घेऊन भाजपाचे कार्यकर्ते अंगावर धावून आल्याचा बनाव करण्यात आला. शिवसेनाभवनावर कुणी वाकड्या नजेरेने पाहील हे आम्ही खपवून घेणार नाही, असा फुकाचा आव आणला गेला. प्रत्यक्षात ‘सोनिया सेना हाय हाय’च्या नाऱ्याने शिवसेनाभवनाचा परिसर दणाणून गेल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते हतबल झाले. भाजपाच्या महिला कार्यकर्त्यांवर हात उचलण्यापर्यंत वेळ शिवसेनेवर आली. आम्ही मारहाण केली नाही, असा कांगावा करताना चोप दिल्याची कबुलीही मुखपत्रातून दिली. एकेकाळी अंगावर धावून जाणारा पक्ष आता बचावाच्या पवित्र्यात आला आहे. सत्तेत राहण्याच्या अगतिकतेमुळे शिवसेनेवर आज ही वेळ आली आहे. भाजपा कार्यकर्त्यांच्या हातात नसलेल्या दगडांचीही त्यांना भीती वाटू लागली आहे. हातून काहीतरी निसटत चालल्याचे हे लक्षण आहे.

Exit mobile version