“एक निवडणूक काय जिंकली आणि शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्न पाहू लागलीय.” असा टोला भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेला लगावला. “संजय राऊत तर कोटही शिवून बसले असतील.” असा खास टोलाही आशिष शेलार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना लगावला.
आशिष शेलार यांनी मीडियाशी संवाद साधताना शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शेलार यांना दादरा नगर हवेलीतील शिवसेनेच्या विजयाबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. “शिवसेनेने हुकूमशाहीबद्दल बोलावं म्हणजे दिवसाढवळ्या संध्याकाळचा आणि रात्रीचा चंद्र कसा दिसतो याचं वर्णन करण्यासारखं आहे. ते एक निवडणूक जिंकले. पण संपूर्ण देशात आम्हाला मोठं आव्हान उभं केलं, किंबहुना स्वप्नात पंतप्रधान बनण्याचीही स्वप्ने पडत असतील, मंत्रीमंडळाची रचनाही केली असेल, खातेवापटही केलं असेल, राऊत साहेब कोट शिवूनही बसले असतील. त्यामुळे तुमच्या स्वप्न रंजनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत.” असा टोला शेलार यांनी लगावला.
हे ही वाचा:
२०३० पर्यंत चीनकडे हजार अण्वस्त्र
दिवाळी हा अमेरिकेतही राष्ट्रीय उत्सव जाहीर
लख लख चंदेरी तेजाची न्यारी अयोध्या
पुढली कारसेवा होईल तेव्हा रामभक्त, कृष्णभक्तांवर पुष्पवृष्टी केली जाईल
केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलची दरवाढ कमी केली आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पंतप्रधानांनी देशवासियांना दिवाळीची भेट दिली आहे. पेट्रोल, डिझेलचे दर कमी केले आहेत. आंदोलन आणि माथी भडकावून लोकांना न्याय मिळणार नाही. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करून दाखवले बोलण्यापेक्षा राज्यातील पेट्रोलचे दर आणखी कमी होऊ शकतात, ती इच्छाशक्ती राज्य सरकारने दाखवावी, असं आव्हानच त्यांनी दिलं. तसेच, राज्यात दोन वादळं झाली अतिवृष्टी झाली. मात्र अद्याप शेतकरी राजाला मदत मिळाली नाही. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मदत करावी, भाजपा तुमच्या पाठिशी उभा राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.