‘शिवसेनेकडूनच शिवाजी महाराजांचे नाव देण्यास टाळाटाळ’

‘शिवसेनेकडूनच शिवाजी महाराजांचे नाव देण्यास टाळाटाळ’

घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाचे काम अजूनही पूर्ण नाही. त्याआधीच पूलाचा नामकरण वाद चांगलाच चर्चेत आला आहे. या पुलाला कुणाचे नाव द्यायचे हा मुद्दा अजूनही पालिका वर्तुळात चर्चेत आहे. शिवसेनेकडूनच शिवाजी महाराज यांचे नाव या पुलाला देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाच्या नावावरून चांगलाच गदारोळ उठला होता. २८ जून रोजी याच उड्डाणपुलाच्या नामकरणाच्या प्रस्तावावरून भाजप नगरसेवकांनी स्थापत्य समितीच्या बैठकीत आक्रमक भूमिका घेतली होती. तसेच, सत्ताधारी शिवसेना व पालिका प्रशासन यांना दोष देत आणि घोषणाबाजी करीत सभात्याग केला होता. त्यामुळे ती बैठक चांगलीच गाजली होती. उड्डाणपुलाच्या नामकरणावरुन चांगलाच वाद उफाळला होता.

घाटकोपर – मानखुर्द लिंक रोड उड्डाणपुलाचे काम सुरू असताना भाजप नगरसेवकांनी या उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली होती. तर मध्यंतरी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनीही या पुलाला सुफी संतांचे नाव देण्याची मागणी केली होती व त्यावरून सेना – भाजपात राजकीय वाद निर्माण झाले होते. मात्र पालिका प्रशासनाने, या पुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नसून आणखीन काही कालावधी लागणार असल्याने एवढ्यात या पुलाचे नामकरण करणे शक्य होणार नाही असे म्हटले होते. त्यामुळे भाजप सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त करीत आणि ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’अशा घोषणा दिल्या होता. प्रशासन व सत्ताधारी शिवसेना यांचा निषेध व्यक्त करीत सभात्याग केला होता. हा उड्डाणपूल शिवाजी नगर जंक्शन ते मोहिते पाटील जंक्शनपर्यन्त २.९० किमी लांबीचा आहे.

या उड्डाणपुलाच्या बांधकामामुळे शिवाजी नगर जंक्शन, बैंगनवाडी जंक्शन, देवनार डंपिंग ग्राउंड, फायर ब्रिगेड व मोहिते पाटील हे परिसर वाहतूक कोंडीतून मुक्त होणार आहेत. तसेच,पालिकेने प्रथमच २४.२ मीटर सेगमेंट कास्टिंग तयार करून सदर पुलाचे बांधकाम पूर्ण केले आहे. तसेच, या उड्डाणपुलामुळे नवी मुंबई, पनवेल, पुणे या ठिकाणी जाणाऱ्या वाहनांची २५ मिनिटांची बचत होणार आहे.

१८ जानेवारी २०२१ च्या कार्यक्रम पत्रिकेवर उपरोक्त उड्डाणपुलाला ‘छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल’ अशा नामकरणाचा प्रस्ताव स्थानिक खासदार मनोज कोटक यांनी मांडल्यानंतर आश्चर्याची गोष्ट म्हणजे १० जून २०२१ रोजी शेजारील लोकसभा मतदारसंघातील शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी या उड्डाणपुलास ‘ख्वाजा गरीब नवाज मोईनुद्दीन चिश्ती अजमेरी’ असे नामकरणासाठी पत्र दिले आणि २३ जुलै २०२१ च्या गटनेत्यांच्या सभेच्या कार्यक्रम पत्रिकेवरील विषय क्रमांक ६ मध्ये समाजवादी पक्षाचे आमदार व गटनेता रईस शेख यांनी याच उड्डाणपुलास ‘सुल्तानुल हिन्द ख्वाजा गरीब नवाज’ (र.अ) असे नामकरण करण्यासाठी पत्र दिलेले आहे.

हे ही वाचा:

येडियुरप्पांचे कार्य शब्दात व्यक्त करण्यापेक्षाही मोठे

शी जिनपिंगची तिबेट भेट हा भारताला इशारा?

भारताची खिल्ली उडवणाऱ्या अमेरिकेवर पुन्हा कोरोनाचे संकट

…आणि बैल आंदोलनजीवींवर वैतागला!

एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कार्यक्रम पटलावर आल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी शिवसेना खासदार आणि समाजवादी पक्ष गटनेता यांनी दुसरे नाव सुचविणे हा महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा उपमर्द आहे. त्यामुळे गटनेत्यांच्या सभेतील सदर प्रस्ताव दफ्तरी दाखल केला पाहिजे, अशी भूमिका भारतीय जनता पक्षाचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मांडली.

अशावेळी स्थापत्य समिती (उपनगरे) ची २९ जुलै २०२१ च्या सभेत नामकरणाच्या विषयाची महापालिकेला तातडीचे कामकाज म्हणून शिफारस करून जुलै महिन्यातच महापालिकेच्या सभेत सदर नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

Exit mobile version