मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व अनुदानित शाळा आणि वैधानिक पालिका समित्यांमध्ये वंदे मातरमचे समूहगान व्हावे अशी मागणी भाजपा मुंबईचे नगरसेवक संदीप पटेल यांनी केली होती. पण सत्ताधारी शिवसेनेने या मागणीकडे पद्धतशीरपणे कानाडोळा केला आहे. त्यामुळे शिवसेनेला आता वंदे मातरमशी पण वावडे आहे का? असा सवाल भाजपाने विचारला आहे.
भाजपाचे मुंबई महापालिकेतील गटनेते प्रभाकर शिंदेंनी याविषयात मुंबईच्या महापौरांना पत्र लिहिले आहे. भाजपा नगरसेवक संदीप पटेल यांनी महापालिका हद्दीतील अनुदानित शाळा आणि पालिका समित्यांमध्ये भारताचे राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे सामूहिक गायन व्हावे असा ठराव जानेवारी २०२० मध्ये मांडला होता. पण या प्रस्तावाला महापौरांनी एकदा तहकूब केले आणि नंतर तीन वेळा याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे शिंदे यांनी महापौरांना पत्र लिहीत या विषयाला तहकूब करण्याचे कारण काय? अशी विचारणा केली आहे. “महापालिका सभागृहात नित्यनेमाने वंदे मातरम म्हटले जाते. मग शाळांमध्ये आणि समित्यांमध्ये समूहगानाला आक्षेप का?” असेही शिंदे यांनी विचारले आहे.
या विषयावरून भाजपा मुंबईने सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. मुंबई भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅन्डल वरून ‘सत्ताधारी शिवसेनेला वंदे मातरमचे वावडे आहे का?’ असा घणाघात करण्यात आला आहे.
सत्ताधारी @ShivSena ला वंदे मातरम् चे वावडे आहे काय ?
वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचे समूहगान महापालिकेच्या हद्दीतील सर्व अनुदानित शाळा व पालिकेच्या सर्व वैधानिक समित्यांमध्ये केले जावे असा ठराव भाजप नगरसेवक @sandeeppatel58 यांनी मांडला होता…
1/2 pic.twitter.com/FVcTUNMIng— BJP MUMBAI (@bjp4mumbai) January 14, 2021