प्रजा फाऊंडेशनने नुकताच मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेतला. याअंतर्गत संयुक्त प्रगती पुस्तकाचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. पण यात पहिल्या १० नगरसेवकांत सत्ताधारी आणि सर्वाधिक नगरसेवक संख्या असलेल्या शिवसेनेचे फक्त ३ नगरसेवक आहेत. तर भाजपाचे मात्र चार नगरसेवक पहिल्या १०मध्ये आहेत. काँग्रेसच्या तीन नगरसेवकांनी पहिल्या १०त स्थान मिळविले आहे.
अहवालानुसार पहिल्या क्रमांकावर पालिकेचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेसचे नगरसेवक रवी राजा आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर शिवसेनेचे समाधान सरवणकर आणि तिसऱ्या क्रमांकावर भाजपच्या हरीश छेडा यांची निवड झाली आहे. पहिल्या दहा नगरसेवकांत भाजपाच्या ज्या चार नगरसेवकांचा समावेश आहे त्यात हरिश छेडा, स्वप्ना म्हात्रे, सेजल देसाई आणि प्रीति सातम आहेत. तर काँग्रेसचे राजा यांच्यासह वीरेंद्र चौधरी आणि मोहसिन हैदर हे पहिल्या दहामध्ये आहेत. शिवसेनेचे समाधान सरवणकर, सचिन पडवळ, सुजाता पाटेकर हे आहेत.
कोरोना साथ लक्षात घेता प्रजा फाऊंडेशनकडून यंदा नगरसेवकांचे वार्षिक प्रगती पुस्तक तयार करण्यात आले नाही. केवळ संयुक्त प्रगती पुस्तक तयार केले गेलेले आहे. यामध्ये रवी राजा, समाधान सरवणकर व हरीश छेडा या तिघांना अनुक्रमे ८१.१२ टक्के, ८०.४२ टक्के आणि ७७.८१ टक्के असे गुण प्राप्त झालेले आहेत.
यंदा प्रगती पुस्तकांतर्गत नगरसेवकांच्या २०१७ ते २०२१ पर्यंतच्या चार वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आलेला आहे. नगरसेवकांनी सभागृहात विचारलेले प्रश्न तसेच त्या अनुषंगाने स्वतःच्या प्रभागात केलेली कामे यावरच हा अहवाल बनविण्यात आलेला आहे. मुख्य म्हणजे मागील चार वर्षात नगरसेवकांनी विचारलेल्या प्रश्नांच्या गुणवत्तेचे मूल्यांकन केले असता कोणत्याही नगरसेवकाला अ श्रेणी प्राप्त झालेली नाही.
हे ही वाचा:
परमबीर सिंग यांना चांदिवाल समितीने ठोठावला दंड
म्हाडाचे रूप पालटण्यासाठी खर्च होणार बाराशे कोटी
मंत्रालयासमोर पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न
अमेरिकेच्या माघारीबद्दल त्या शहीद सैनिकाच्या वडिलांना दुःख
केवळ १० टक्के नगरसेवकांनाचा अ आणि ब श्रेणी मिळालेली आहे. सत्ताधारी शिवसेनेचे यामध्ये केवळ तीन नगरसेवक आहेत. कोरोनामुळे सुरुवातीच्या काळात बैठका होत नव्हत्या. नंतर दृकश्राव्य माध्यमातून या बैठका घेण्यास सुरुवात झाली. याच गोष्टींचा हा अहवाल तयार करताना विचार करण्यात आलेला आहे. उर्वरित नगरसेवकांचा क, ड, ई, फ श्रेणीत समावेश झाला आहे.