शिवसेनेचे मुख्यमंत्री, तरी होत नाहीत शिवसेना आमदारांची कामे

शिवसेनेचे मुख्यमंत्री, तरी होत नाहीत शिवसेना आमदारांची कामे

शिवसेनेचा मुख्यमंत्री तरीही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत अशी आमदारांची भावना असल्याचा खळबळजनक दावा शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केला आहे. रविवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात सरनाईक यांनी हा दावा केला आहे. त्यासोबतच त्यांनी महाविकास आघाडीतील सहयोगी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीकास्त्र डागले आहे.

सरनाईक यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बमुळे महराष्ट्रातील राजकीय चर्चांना उधाण आले आहे. सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहीत राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सहयोगी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तर त्याचवेळी त्यांनी राज्यातील शिवसेना आमदारांच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.

हे ही वाचा :

सरकारचा अजब कारभार; कोविड सेंटरमध्ये शिकाऊ वैद्यकीय तज्ज्ञ

हात की सफाई; इकडचा कचरा तिकडे…

लोकांनी तुमच्यासाठी जोडे तयार ठेवलेत!

भाजपाशी जुळवून घ्या…प्रताप म्हणे!

काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करायला ‘महाविकास आघाडी’? शिवसेना आमदारांची कुजबुज
गेल्या दीड वर्षात राज्यातील आपल्या पक्षाच्या अनेक आमदारांशी चर्चा केल्याचा दावा सरनाईक यांनी पत्रात केला आहे. तर या चर्चेत आमदारांनी कामे होत नसल्याचंही भावना बोलून दाखवल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे. “काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे झटपट होतात, मात्र आपला मुख्यमंत्री असूनही शिवसेना आमदारांची कामे होत नाहीत” अशी काही आमदारांची अंतर्गत नाराजी असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे. तर भाजपाशी युती तोडून शिवसेना पक्षाने काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे करायला ‘महाविकास आघाडी’ स्थापन केली की काय? अशी चर्चा रंगली असल्याचे प्रताप सरनाईक यांनी नमूद केले आहे.

तर याच पात्रातून सरनाईक यांनी भाजपाशी जुळवून घ्यावे असा सल्लाही मुख्यमंत्री ठाकरे यांना दिला आहे. त्याचवेळी त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात जोरदार फटकेबाजी केली आहे. महाविकास आघाडी एका विशिष्ट हेतूने झाली असली तरीही काँग्रेस पक्ष एकला चलो रे चा नारा देतोय. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा इतर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते फोडण्यापेक्षा शिवसेनेचेच नेते,कार्यकर्ते फोडत आहेत असा खळबळजनक आरोप सरनाईक यांनी केला आहे. तर आपल्या मागे तपस यंत्रणांचा ससेमीरा लागू नये यासाठी महाविकास आघाडीतील काही मंत्री आणि काही सनदी अधिकारी हे केंद्रातील सत्ताधारी पक्षासोबत छुपी हातमिळवणी करत आहेत असे सरनाईक यांनी म्हटले आहे. सत्तेत एकत्र राहूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलेच नेते फोडत असेल, आपला पक्ष कमकुवत करत असेल तर अशा परिस्थितीत पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्यासोबत जुळवून घेतलेले बरे, असे आपले वैय्यक्तिक मत असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.

Exit mobile version