मालाड येथील मैदानाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरून भाजपाने तीव्र विरोध केला होता. त्यानंतर आता मुंबई महानगरपालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेने चक्क या मैदानाला राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. त्यावरून भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी कठोर टीका केली असून सत्ता तुमचीच आहे, निर्णय तुमचाच आहे आणि मागणी कसली करता लबाडांनो? असे म्हटले आहे.
मालाड येथील या मैदानाचे लोकार्पण पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते झाले होते. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीने आणि इतर हिंदुत्ववादी संघटनांनी या गोष्टीला कडाडून विरोध केला होता. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात टिपूचे गोडवे गायची गरज काय? असा सवाल या निमित्ताने विचारला जात होता.
मालाड येथील मैदानात टिपू सुलतान नावाचे नामफलक आहेत. मात्र, हे नामकरण अधिकृतरित्या झालेले नाही. त्यामुळे उपमहापौर, शिवसेनेचे काही नगरसेवक व विभागप्रमुखांनी या मैदानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.
सत्ता तुमची, निर्णय तुमचा नि मागणी कसली करता लबाडांनो? pic.twitter.com/Ou55f1vmsI— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 24, 2022
भाजपाचे आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते प्रजासत्ताकदिनी रस्त्यावर उतरले होते. या उद्यानाच्या बाहेर हजारोंच्या संख्येने हे कार्यकर्ते जमले होते मंत्री अस्लम शेख यांच्या विरोधात जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी करण्यात आली.
हे ही वाचा:
युद्धाच्या ठिणगीने कच्च्या तेलाचा भडका
मंत्रिपदावर राहिलेल्या व्यक्तीने मुंबई बॉम्बस्फोटातील व्यक्तीकडून जमीन का घेतली?
रशिया- युक्रेन युद्धाला सुरुवात…
२०२४ ला भाजपाचे दक्षिणेतून किती खासदार येणार?
यावेळी महाराष्ट्रद्रोही टिपू सुलतानचे नाव महाराष्ट्रात हवेच कशाला असा सवाल आंदोलकांनी केला होता. तर महाराष्ट्रातल्या उद्यानाला छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, झाशीची राणी लक्ष्मीबाई, महाराणा प्रताप अशा वीरांचीच नावे देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर आता शिवसेनेला जाग आली असून सत्तेत असतानाही त्यांनी टिपूऐवजी राणी लक्ष्मीबाई यांचे नाव देण्याची मागणी केली आहे.
कर्नाटकातील टिपू सुलतानचे महाराष्ट्रातील ठिकाणांना नाव देण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केला जात असतो. तरीही उद्याने, पूल यांना टिपू सुलतान नाव देण्याचा खोडसाळपणा केला जातो.