टूलकिट प्रकरणात अटक वॉरंट निघालेल्या शंतनू मुळूकचे आता शिवसेना कनेक्शन पुढे येत आहे. शंतनू मुळूकचा भाऊ हा शिवसेनेचा बीड जिल्हा प्रमुख आहे. शंतनू हा टूलकिट प्रकरणातल्या प्रमुख आरोपींपैकी एक आहे.
मुळचा बीडचा असणारा शंतनू मुळूक हा दिल्लीत राहत होता. टूलकिट प्रकरणात त्याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून तो गायब आहे. त्यामुळेच त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस बीडमध्ये दाखल झाले असून शंतनू याच्याविषयची अधिक माहिती मिळवत आहेत. सचिन मुळूक हा शंतनूचा चुलत भाऊ असून तो शिवसेनेचा सक्रिय पदाधिकारी आहे. शिवसेना बीड जिल्हा प्रमुख असणाऱ्या सचिन मुळूकने आपल्या भावाची पाठराखण केली आहे. “शंतनू हा पर्यावरण कार्यकर्ता असून तो शेतकरी आंदोलनाचे समर्थन करतो. हा गुन्हा आहे का?” असा सवाल सचिनने उपस्थित केला आहे.
हे ही वाचा:
दरम्यान दिल्ली पोलिसांनी काढलेल्या अटक वॉरंट विरोधात शंतनू न्यायालयात गेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठासमोर शंतनूने ट्रान्झिट जामीनसाठी अर्ज केला आहे.
पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू या तिघांनी टूलकिट दस्ताऐवज तयार केले होते. तसेच झूम ऍपवरून या तिघांनी मिटिंग करून अपप्रचार करण्याचे षडयंत्र रचले होते. दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला.
“हे शिवसेना कनेक्शन बोलके आहे.” – आ.अतुल भातखळकरांचा टोला
दरम्यान शंतनू मुळूकच्या शिवसेना कनेक्शनवरून राज्याचे राजकारण तापताना दिसत आहे. “शिवसेना पदाधिकारी असलेला शंतनूचा भाऊ निर्लज्जपणे आपल्या भावाचे समर्थन करतो. हे शिवसेना कनेक्शन बोलके आहे.” असा टोला लगावत, शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
टूल किट प्रकरणातील दिल्ली पोलिसांना हवा असलेला आरोपी शंतनू मुळूक हा शिवसेनेच्या बीड जिल्हाप्रमुख सचिन मुळूकचा चुलत भाऊ असून जिल्हाप्रमुख आता निर्लज्जपणे पर्यावरणकार्यकर्ता म्हणून भावाचे जोरदार समर्थन करत आहे. हे शिवसेना कनेक्शन बोलके आहे. शिवसेनेने याप्रकरणी भूमिका स्पष्ट करावी.
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) February 16, 2021