शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत सावलीसारखा राहिलेला चंपासिंग थापा याने एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत राहिलेला चंपासिंग थापा याला टेंभीनाका नवरात्रौत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मुख्यमंत्री या आपल्या ठाण्यातील गडावरील देवीच्या दर्शनासाठी आले असताना थापाचे त्यांनी आपल्या गटात स्वागत केले आणि त्याला शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले.
चंपासिंग थापा हा बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांच्या अवतीभवती नेहमीच दिसत असे. बाळासाहेबांचे निधन झाले त्यावेळीही अंत्यविधीच्या दरम्यान तो शिवाजी पार्कवर हजर असल्याचे दिसले होते. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्याचे काम केल्यामुळे आपण त्यांच्यासोबत जात आहोत, असे थापाने पत्रकारांना सांगितले.
हे ही वाचा:
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून मुख्यमंत्री अशोक गेहलोत बॅकफूटवर?
नारायण राणे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाही
पोलिस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांना खुशखबर!! लवकरच जागा भरणार
बाकी राजकारणी माणसे इकडून तिकडे उड्या मारताना दिसली तर सर्वसामान्य जनता त्यांना गांभीर्याने घेत नाही. पण थापासारखा बाळासाहेबांचा निष्ठावंत आणि त्याचा राजकारणाशी तसा कोणताही संबंध नसताना त्याने बाळासाहेबांच्या विचारासाठी एकनाथ शिंदे यांची साथ दिल्यामुळे त्याला एक वेगळा अर्थ प्राप्त होत आहे. बाळासाहेबांचे विचार पुढे नेणारी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे दावा करत असतात. त्यांच्या दाव्याला थापाच्या शिंदे गटातील प्रवेशामुळे बळकटी मिळाली आहे का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांचे विचार पुढे नेत नाहीत असाच अर्थ थापाच्या या वक्तव्यातून स्पष्ट होतो.
एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्यावर शिवसेनेतून टीका होत होती. आता थापाच्या बाबतीत कोणती भूमिका उद्धव ठाकरे घेणार याची उत्सुकता आहे.