शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काही वर्षांपूर्वी ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रात नथुराम गोडसे यांची ठामपणे बाजू घेतली होती आणि गोडसे हे देशभक्त होते, अशी रोखठोक भूमिका अग्रलेखातून मांडली होती. पण तेव्हा अग्रलेख लिहिणारे संजय राऊत आज मात्र नथुराम देशभक्त होता तर त्याने जिन्ना यांना का मारले नाही, असा सवाल उपस्थित करत आहेत. त्यावरून राऊत यांच्या बदललेल्या भूमिकेची चर्चा होऊ लागली आहे.
महात्मा गांधी यांची ३० जानेवारी ही पुण्यतिथी. राहुल गांधी यांनी नथुरामबद्दल केलेल्या वक्तव्याचा संदर्भत देत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. राहुल गांधी म्हणाले होते की, हिंदुत्ववाद्याने (नथुराम) महात्मा गांधी यांना मारले. त्यावर संजय राऊत म्हणाले की, जर कुणी खरा हिंदुत्ववादी असता तर त्याने जिन्ना यांना मारले असते. त्याने गांधींना का मारले असते?
राऊत पुढे म्हणाले की, पाकिस्तानची मागणी ही जिन्नांची होती. जर तुमच्यात हिंमत असती तर तुम्ही ज्याच्यामुळे फाळणी झाली आणि दंगली उसळल्या त्या जिन्नांना मारले असते. ती खरी देशभक्ती ठरली असती. गांधींना मारणे योग्य नव्हते. आजही गांधीजींच्या त्या मृत्युबद्दल जगभरात दुःख आणि वेदना व्यक्त होतात.
हे ही वाचा:
पालकमंत्री अस्लम शेख यांच्या बॅनरबाजीने नगरसेवक वैतागले!
जीवाच्या भीतीने कॅनडाचे राष्ट्रपती अज्ञातवासात
…तर वायनरी त्यांच्या नावावर करायला तयार!
पण १० वर्षांपूर्वी परिस्थिती पूर्णपणे वेगळी होती. २०१०मध्ये ८४व्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्मरणिकेत नथुराम गोडसे यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून राष्ट्रवादी, काँग्रेस यांनी सडकून टीका केली होती. तेव्हा नथुरामच्या जागी इशरत जहाँचा (२००४मध्ये अहमदाबाद येथे पोलिस एन्काऊंटरमध्ये मारली गेली होती) फोटो लावला तर चालेल का, असा खोचक सवाल शिवसेनेने उपस्थित केला होता. शिवाय, नथुरामने नेहमी एकसंध भारताला पाठिंबा दिला. अशी भूमिका व्यक्त करणे हे ऱाष्ट्रविरोधी आहे का? असेही या अग्रलेखात म्हटले होते. याच अग्रलेखात सोनिया गांधी यांना टोमणा मारताना पंडित नथुराम गोडसे हे इटलीतून इथे आले नव्हते, असेही नमूद केले होते.
आता याच शिवसेनेने तेव्हा नथुरामवरून आगपाखड करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी सलोखा करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केल्यानंतर मात्र भूमिका पूर्ण बदलली आहे, हे स्पष्ट होत असल्यामुळे त्याची चर्चा सुरू झाली आहे.