महाराष्ट्राच्या राजकारणात सचिन वाझे प्रकरणावरून गदारोळ सुरु आहे. सचिन वाझे प्रकरणावरून भाजपा आक्रमक झालेली दिसत आहे, तर शिवसेना एकाकी पडलेली दिसत आहे. सरकारमधील मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी वाझे प्रकरणावरून आक्रमक झालेले दिसत आहेत. गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी तपासात बाधा येऊ नये म्हणून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची बदली केल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे पडलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या सर्व बदल्या केवळ ‘रुटीन’ बदल्या असल्याचे सांगितले होते. तर काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार कुमार केतकर यांनी मनसुख हिरेन हत्येचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केंद्राकडे केली आहे.
सचिन वाझेंना अटक केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी (सचिन वाझे, परमबीर सिंह) हे छोटे मासे असल्याचे सांगितले होते. यांचे राजकीय हस्तक कोण आहेत? हेही शोधून काढले पाहिजे, असेही ते म्हणाले होते. फडणवीसांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन वाझे प्रकरण कालच विस्तृतपणे सांगितले होते. यानंतर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही वाझे प्रकरणात शिवसेनेची साथ सोडल्याचे दिसत आहे.
हे ही वाचा:
राजकीय भूकंपाची शक्यता, दोन मंत्र्यांची होणार एनआयएकडून चौकशी?
दिल्लीत फडणवीस, मोदी, शाह यांची बैठक
लवकरच टोलमुक्ती होणार-नितीन गडकरी
सचिन वाझेंनी वापरलेला सदरा एनआयएच्या ताब्यात
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना चौकशीत अडथळा येऊ नये म्हणून परमबीर सिंह यांची बदली केल्याचे सांगितले. याशिवाय धनंजय मुंडे आणि रेणू शर्मा प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंडेंची पाठराखण करून त्यांना वाचवले होते. परंतु शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना मात्र वनमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या सर्व प्रकरणानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये कुरबुरी वाढू लागल्याचे स्पष्ट झाले होते. परंतु आता काँग्रेसनेही शिवसेनेची साथ सोडली असल्याचे दिसत आहे.
कुमार केतकर यांनीही आज राज्यसभेत मनसुख हिरेन प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केल्याने आता महाविकास आघाडीतील शिवसेना हा एकमेव पक्ष सचिन वाझेंच्या बाजूने उभा असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी स्वतःच, “सचिन वाझे हे काही लादेन नाहीत.” अशा शब्दात वाझेंचा बचाव केला होता. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनीही साथ सोडल्याने शिवसेना सचिन वाझे प्रश्नात एकाकी पडल्याचे चित्र दिसत आहे.