शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध

शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाला विरोध

घाटकोपर मानखुर्द लिंक रोड जोडमार्गावरील उड्डाणपुलाचे छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे नामकरण करण्यास शिवसेनेचाच विरोध असल्याचे आता समोर येते आहे. या पुलाला शिवछत्रपतींचे नाव देण्याची मागणी भाजपाचे खासदार मनोज कोटक यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच केलेली होती. पण शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी १० जूनला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून या पुलाला सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज (मोईन्नुदीन सुफी चिश्ती-अजमेरी) यांचे नाव देण्याची मागणी केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे शिवछत्रपतींच्या नावाला शिवसेनेचाच आता विरोध आहे, हेच यातून दिसून येते आहे.

खासदार कोटक यांनी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समितीला (उपनगरे) ९ डिसेंबर २०२०ला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड जोडमार्गावरील शिवाजीनगर आंतरछेदावरील उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. हा पूल पूर्वीच्या शिवाजी नगर चौकावरून जातो. त्यामुळे या पुलाचे नाव छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे करण्यात यावे, अशी सूचना मी करतो.

हे ही वाचा:
…आणि बघता बघता पार्किंगमधली कार बुडाली

गंगेतील मृतदेहांवरील कविता म्हणजे एक कट

गुलामाचा स्वाभिमान जागा होण्यासाठी पाच वर्षे का लागली!

पटोलेंना व्हावेसे वाटते मुख्यमंत्री; मग उद्धव ठाकरेंचे काय?

आता शेवाळे यांनी मात्र तेथील मुस्लिम समुदायाचा आग्रह लक्षात घेऊन ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. शेवाळे यांच्या पत्रामुळे मात्र शिवसेनेला महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शेवाळे यांनी लिहिलेल्या या पत्रानंतर महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. शेवाळे यांनी या पत्रात छेडानगर ते मानखुर्द या परिसरात ७० टक्के मुस्लिम असल्यामुळे त्यांच्या मागणीखातर ख्वाजा गरीब नवाज यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील झाल्यापासून शिवसेनेचा बदललेला चेहराच या पत्रामुळे पूर्ण उघडा पडला आहे. आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्या शिवसेनेला आता त्यांचे नावही पुलाला द्यावेसे वाटू नये, याबद्दल आश्चर्य आणि संताप व्यक्त होत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा मुस्लिम लांगुलचालनाला असलेला प्रखर विरोध आता मावळला आहे आणि मतांसाठी मुस्लिमांची दाढी कुरवाळण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे, असा अर्थ शेवाळे यांच्या पत्रातून काढला जाऊ लागला आहे.

Exit mobile version