महापालिकेच्या जम्बो कोविड रुग्णालयाच्या कामात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यावरून त्यांनी संजय राऊत आणि त्यांचे निकटवर्ती सुजीत पाटकर यांच्यावर निशाणा साधाल होता. या भ्रष्टाचारासंदर्भात महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यासाठी किरीट सोमय्या पुणे महापालिकेत आले असताना त्यांच्यावर शिवसैनिकांनी जोरदार हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.
किरीट सोमय्या यांना सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून वेळीच गाडीत बसवले त्यामुळे सोमय्या थोडक्यात बचावले. किरीट सोमय्या सायंकाळी साडे चारच्या सुमारास महापालिकेत आयुक्त विक्रमकुमार यांना निवेदन देण्यासाठी येणार होते. त्यावेळी हे शिवसैनिक आधीच उपस्थित होते. किरीट सोमय्या घटनास्थळी पोहचताच शिवसैनिक घोषणाबाजी करत सोमय्या यांच्याकडे आले. सुरक्षारक्षकांनी त्यांना घेराव घालून सोमय्या यांना महापालिकेच्या इमारतीमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी आणि धक्काबुक्की करायला सुरुवात केली. त्यामुळे मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. सोमय्या यांना गाडीत बसू देण्यासही शिवसैनिकांनी विरोध केला. त्यांच्या सुरक्षारक्षकांना ही धक्काबुक्की करण्यात आली. त्यावेळी किरीट सोमय्या पायऱ्यांवर पडले. सोमय्या यांची गाडी महापालिकेतून बाहेर पडत असताना शिवसैनिकांनी गाडी रोखण्याचा देखील प्रयत्न केला.
हे ही वाचा:
‘संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला’
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपची बांधणी
श्रीमंतांच्या यादीत झुकरबर्गला मागे टाकत अंबानी, अदानी अव्वल
मुंबई, ठाण्यात जिओ नेटवर्क गायब!
दरम्यान, शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर आता किरीट सोमय्या यांनी एक ट्वीट केले आहे. पुणे महापालिकेच्या परिसरात शिवसैनिकांच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, असे ट्वीट सोमय्या यांनी केले आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. सरकार तुमचे आहे, कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी तुमची आहे. जर सोमय्या आरोप करत असतील तर ते खोटे आहेत हे सिद्ध करुन दाखवा, घोषणाबाजी आणि अंगावर धावून काय येता? असा खोचक सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
I am attacked by Shivsena Gundas inside the premises of Pune Mahapalika@BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) February 5, 2022