शिवसेनेचा सत्ताग्रह! ठाणे महापालिकेत गांधींचा विसर

शिवसेनेचा सत्ताग्रह! ठाणे महापालिकेत गांधींचा विसर

ठाणे महानगर पालिकेतील शिवसेनेचा सत्ताग्रह पुन्हा एकदा दिसून आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती दिनी म्हणजेच शनिवार, २ ऑक्टोबर रोजी महापालिकेतील प्रशासकीय कार्यक्रमाचा विसर पडून राजकीय कार्यक्रमाला शिवसेना नेत्यांनी महत्त्व दिलेले दिसून आले आहे.

शनिवार, २ ऑक्टोबर रोजी ठाणे महानगरपालिकेच्या इमारतीत गांधी जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी, ११ वाजता हा कार्यक्रम होणार होता पण या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेना पक्षाचे महापौर नरेश म्हस्के यांच्यासकट एकही नगरसेवक उपस्थित राहिला नव्हता. तर पालिकेतील प्रशासकीय अधिकाऱ्यांपैकीही कोणतेच अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते.

हे ही वाचा:

दुबई एक्प्सोमध्ये ‘मुक्त, संधी आणि वाढ’ ही भारताची थीम!

“बापूंचे जीवन प्रत्येक पिढीसाठी मार्गदर्शक” – पंतप्रधान मोदी

राम मंदिर ठरतंय ‘दुबई एक्सपो’ चा आकर्षण बिंदू

मोदींना आव्हान देण्याची क्षमता राहुल गांधींमध्ये नाही… का म्हणतोय काँग्रेसचा नेता?

भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संजय वाघुले, नारायण पवार, सुरेश जोशी तसेच महापालिकेतील विरोधी पक्षनेते शानु पठाण हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते. पण महापालिकेतील सत्ताधारी आणि अधिकारी यांच्यापैकी कोणीच हजर नसल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला. साडे अकरा वाजून गेले तरी देखील कोणीच या कार्यक्रमाला उपस्थिती लावली नाही. उलट या कार्यक्रमाकडे पाठ फिरवून दिव्यातील एका राजकीय कार्यक्रमाला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी उपस्थिती लावल्याचे दिसून आले.

अखेर उपस्थित भाजपाच्या नगरसेवकांनी आणि विरोधी पक्ष नेते शानू पठाण यांनीच महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम पार पाडला. एकीकडे संपूर्ण देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात असतानाच ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेच्या या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र नाराजी ठाणेकरांकडून व्यक्त केली जात आहे. तर भाजपाने या कारभारावर सडकून टीका केली आहे.

Exit mobile version