शिवसेनेवर काँग्रेसने केला ८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

शिवसेनेवर काँग्रेसने केला ८०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप

मुंबईत येऊ घातलेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या तयारीला आत्तापासूनच प्रत्येक पक्षाने सुरूवात केली आहे. प्रत्येक पक्ष आपापली रणनिती आखत असतानाच काँग्रेसने शिवसेनेवर तब्बल ८०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला आहे.

मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर काँग्रेस पक्षाचे रवी राजा यांनी मालमत्ता करात घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. हा घोटाळा सुमारे ७०० ते ८०० कोटी रुपयांचा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एकट्या वरळीतच सुमारे १०० कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मालमत्ता कराच्या वसुलीत हा घोटाळा केला असल्याचे म्हटले जात आहे. त्याबरोबरच प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे सत्ताधारी शिवसेना यासाठी जबाबदार असल्याचे रवी राजा यांनी म्हटले आहे.

हे ही वाचा:

केंद्र सरकारचा मराठा आरक्षणाला पाठिंबा

संजय राऊत सारखा पलटी मास्टर दुसरा नाही

घरकोंबडा मुख्यमंत्री असल्यामुळे विरोधी पक्षनेत्याकडे दाद मागितली जाते

“वरळी येथील मालमत्तेचे एकूण क्षेत्रफळ दाखवण्याऐवजी केवळ दहा टक्क्यांपर्यंतच दाखवून कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर वसुल करण्याच्या जागी केवळ काही लाखांचा मालमत्ता कर वसुल करण्यात आला. कित्येक गिरण्यांच्या भूखंडाबाबत देखील असाच घोटाळा करण्यात आला आहे. हा प्रकार फक्त वरळी पुरता मर्यादित नसून संपूर्ण मुंबईत असाच प्रकार सुरू आहे. यातून सुमारे ७०० ते ८०० कोटी रुपयांचा घोटाळा झाला आहे.” असा आरोप रवी राजा यांनी शिवसेनेवर केला आहे. त्याबरोबरच हे पैसे मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत भरले जाऊन जनतेच्या कामासाठी वापरले जाणे अपेक्षित होते, मात्र यातून केवळ अधिकाऱ्यांच्या तिजोऱ्या भरल्या गेल्या असा घणाघाती आघात देखील त्यांनी केला आहे.

याबाबत ते लवकरच मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे लेखी तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या घोटाळ्यातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील करणार असल्याचे सांगितले.

Exit mobile version