काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे गेल्या काही वर्षांपासून स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानजनक शब्दांचा प्रयोग करत असल्यामुळे वारंवार टीकेचे लक्ष्य होत आलेले आहेत. आता काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची कन्या शिवानी वडेट्टीवार यांनी सावरकरांबद्दल अभद्र टिप्पणी करून नवा वाद निर्माण केला आहे.
राहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने भारतात आलेले असताना मी सावरकर नाही गांधी आहे, अशी टिप्पणी करून त्यांनी नवा वाद उत्पन्न केला होता. आता काँग्रेसमधील नेत्याच्या मुलीने केलेल्या टिप्पणीमुळे वाद पेटणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल शिवानी वडेट्टीवार यांनी एका भाषणादरम्यान केलेल्या टिप्पणीचा व्हीडिओ शेअर केला आहे. त्यात सावरकर हे बलात्काराचा विरोधी पक्षांसाठी हत्यार म्हणून उपयोग करण्याचे विचार प्रसारित करतात असे विधान केल्याचे दिसते. हे सावरकर हिंदूंचे प्रेरणास्थान कसे असा सवालही शिवानी वडेट्टीवार यांनी केला आहे.
शिवानी वडेट्टीवार यात म्हणाल्या आहेत की, हे लोकं शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवर कधी मोर्चा काढत नाहीत तर कुठला मोर्चा काढतात? सावरकर मोर्चा काढतात. माझ्यासोबत इथे सगळ्या भगिनी उपस्थित आहेत. सगळ्यांना भीती वाटत असेल की सावरकरांचे विचार काय होते, बलात्कार हे राजकीय हत्या आहे. हे तुम्ही आपल्या राजकीय विरोधकांच्या विरोधात वापरले पाहिजे, असे सावरकर म्हणत. या विचारांचे समर्थन केले जाते. मग माझ्यासारख्या महिलांना कसे सुरक्षित वाटेल? आणि लोक सावरकरांची रॅली काढतात.
शिवानी वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यावर भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे. नेतेच जर सावरकरांचा इतिहास समजू शकले नसतील तर त्यांच्या कार्यकर्त्यांकडून काय अपेक्षा ठेवणार? काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी नागपुरात जाऊन देशाच्या संस्कृतीची नाचक्की होईल, अशी वर्तणूक केली आहे. सावरकरांबद्दल ते असे प्रश्न उपस्थित करतात त्याची आता दया येते. काँग्रेसची ही विनाशकाले विपरित बुद्धी आहे. ही राजकीय आत्महत्या ते करत आहेत. स्वैराचारी स्वातंत्र्य त्यांना हवे आहे. काँग्रेस ते जन्माला घालत आहे.
शिवानी वडेट्टीवार यांच्या या वक्तव्यामुळे एकूणच महाराष्ट्रात पुन्हा खळबळ उडाली असून पुन्हा एकदा नवा वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.
हे ही वाचा:
मुंबईत अतिरेकी शिरल्याचा फोन त्याने भावाला त्रास देण्यासाठी केला…
अरविंद केजरीवाल यांना सीबीआयचे बोलावणे
आर्थिक गुन्हेगारांना भारतात कसे पाठवता येईल? मोदी-सुनक झाली चर्चा
…म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती सावरकरांची स्तुती!
उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष
राहुल गांधी यांनी मी सावरकर नाही, गांधी आहे विधान केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती आणि अशी विधाने करू नयेत असा इशारा संभाजीनगरात झालेल्या सभेत दिला होता. पण आता वडेट्टीवार यांच्या मुलीने केलेल्या या वक्तव्यानंतर उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार, ते यावेळीही इशारा देणार का असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे.
येत्या काही दिवसांत राहुल गांधी हे महाराष्ट्रात येत असून ते उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. त्यांनी आधी सावरकरांची माफी मागावी नाहीतर त्यांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, अशी भूमिका महाराष्ट्र भाजपाने मांडली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे कोणते पाऊल उचलतात याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसने सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अभद्र टिप्पणी करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या शिदोरी या मासिकातही सावरकरांबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आला होता. राहुल गांधीही सावरकरांची बदनामी करत असतात.