शिवसेनेने बंडखोर आमदारांना व्हीप बजावल्यानंतर एकनाथ शिंदे अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनतर एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिले आहे. एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन मुख्य प्रतोदपदी भरत गोगावले यांची नियुक्ती केली आहे.
शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांना पत्र पाठवून कारवाईचा इशारा दिला. त्यामुळे संध्याकाळपर्यंत बंडखोर आमदार वर्ष बंगल्यावर परत येणार का? असा सवाल होत असतानाच एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून या प्रकरणाला वेगळे वळण दिले आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे त्यांनी ट्विट केले. त्यांनतर सुनील प्रभू यांनी काढलेले आदेश हे कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असंही त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार श्री.भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत.
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) June 22, 2022
हे ही वाचा:
अफगाणिस्तानमध्ये भूकंपाच्या धक्क्यात २५५ लोकांचा मृत्यू
संजय राऊत यांनी सांगितले, सरकारचा कारभार आटोपला
‘जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल’
आदित्य ठाकरेंची रामराज्याची प्रार्थना फळली!
याआधीसुद्धा एकनाथ शिंदे यांनी ते बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक असल्याचे ट्विट केले होते. बाळासाहेबांनी आम्हाला हिंदुत्वाची शिकवण दिली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण यांच्याबाबत आम्ही सत्तेसाठी कधीही प्रतारणा केली नाही आणि करणार नाही, असे त्यांनी याआधी ट्विट केले होते. त्यानंतर त्यांनी हे दुसरे ट्विट केले आहे.