महाराष्ट्र विधान परिषदेच्या पाच जागांसाठी २७ मार्च रोजी पोटनिवडणूका पार पडणार आहेत. या जागांसाठी अर्ज भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडे तीन, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे प्रत्येकी एक एक जागा आली आहे. दरम्यान, रविवारी भाजपाकडून विधानपरिषदेच्या रिक्त जागांसाठी तीन उमेदवार घोषित करण्यात आले. संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी या तिघांना संधी देण्यात आली आहे. यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणाला संधी दिली जाणार याकडे लक्ष होते.
विधानपरिषदेच्या एका जागेसाठी शिवसेनेकडून एक नाव जाहीर करण्यात आले आहे. शिवसेनेचे संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांना पुन्हा विधानपरिषदेवर पाठवलं जाणार आहे. त्यामुळे चंद्रकांत रघुवंशी हे शिवसेनेचे विधानपरिषदेचे उमेदवार असणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.
पाच जागांपैकी एक जागा शिवसेनेच्या वाट्याला आलेली असताना यासाठी अनेकजण इच्छुक होते. अनेकांची नावे स्पर्धेत पुढे होती. यात धुळे- नंदुरबारचे शिवसेना संपर्क प्रमुख आणि माजी विधानपरिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांचे नावही आघाडीवर होते. त्यासोबतच शीतल म्हात्रे, संजय मोरे, किरण पांडव यांचीही नाव चर्चेत होती. अखेर चंद्रकांत रघुवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
हे ही वाचा:
पाकमध्ये जमियतचे नेते मुफ्ती नूरझाई यांची गोळ्या झाडून हत्या
शांतता राखण्याच्या प्रत्येक प्रयत्नात पाककडून विश्वासघात!
हिंदुत्ववादी संघटना एकटवल्या; ‘शिवाजी विद्यापीठा’च्या नामांतरासाठी कोल्हापुरात निघणार मोर्चा
देशासाठी धोकादायक असलेल्या नार्को दहशतवादाला आळा घालणे महत्त्वाचे
विधानपरिषदेतील शिवसेनेचे सदस्य आमश्या पाडावी हे अक्कलकुवा मतदार संघातून विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यामुळे पाडवी यांची विधानपरिषदेतील जागा रिक्त झाली होती. सव्वातीन वर्ष कार्यकाळ बाकी असलेल्या या जागेसाठी विधान परिषदेची निवडणूक होत आहे. चंद्रकांत रघुवंशी यांनी यापूर्वी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत काम केलं आहे. ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते. २०१९ मध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आणि नंतर फुट पडल्यावर एकनाथ शिंदे यांची साथ दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता असणार आहे.