शिवभोजन थाळी बंदचा निर्णय नाही

शिवभोजन थाळी बंदचा निर्णय नाही

महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरु करण्यात आलेली शिवभोजन थाळी बंद केली जाणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र, या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विराम दिला आहे. शिवभोजन थाळी बंदचा निर्णय घेतलेला नाही, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारने शिवभोजन थाळीद्वारे राज्यात गरिबांना दहा रुपयांत जेवण देण्याची योजना सुरु केली होती. कोरोना महामारीत हीच थाळी पाच रुपयांना करण्यात आली होती. मात्र, या शिवभोजन थाळीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे ही योजना शिंदे फडणवीस सरकार बंद करणार अशी चर्चा सुरु झाली होती.

याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी संदर्भात चर्चा करण्यात आली. या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवभोजन थाळी सुरु ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र शिवभोजन थाळीमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री शिवभोजन थाळीचा आढावा घेणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

हे ही वाचा:

सर्वोच्च न्यायालयाने उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळली, शिंदेंना दिलासा

पूजा कोणाची करा, हे जामिनावरील आरोपी सांगतोय….

अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार

पीएफआय सदस्यांच्या फोनमध्ये पाकिस्तानी नंबर

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ही शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली होती. राज्यात एक लाख ८८ हजार ४६३ एवढ्या थाळ्यांची विक्री होते. शिवभोजन थाळीसाठी विविध ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. ही केंद्र चालवणाऱ्यांना राज्य सरकारकडून विविध मदत दिली जाते.

Exit mobile version