३० जूनला एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यादरम्यान, शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्राला होती. अखेर या प्रतिक्षेला विराम लागणार असल्याची चिन्हे दिसत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,२६ जुलै रोजी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
मंत्र्यांच्या यादीला हायकमांडची मंजुरी घेण्यासाठी आज, २२ जुलै रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत. मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, मंत्रिमंडळाचा विस्तार २६ जुलै रोजी होणार आहे.
पहिल्या टप्प्यात जवळपास तीस मंत्री शपथ घेणार आहेत. यामध्ये भाजपा आणि शिवसेनेचे आमदार सहभागी होणार आहेत. उद्धव ठाकरे सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्यांपैकी नऊ मंत्री शिंदे यांच्याकडे आहेत. त्यांना पुन्हा मंत्री करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रपती कोविंद यांना फेअरवेल डिनर
बजरंग दलाने कॉंग्रेसच्या पक्ष कार्यालयावर लिहिले हज हाऊस
चीनमध्ये बँकिंग संकट; नागरिकांना रोखण्यासाठी बँकांसमोर रणगाडे तैनात
पंतप्रधान मोदींनी घेतली द्रौपदी मुर्मू यांची भेट
यापैकी ठाकरे सरकारमधील काही राज्यमंत्र्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्री केले जाऊ शकते. भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाकृष्ण विखेपाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर हे मंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. दरम्यान, ३० जून रोजी राज्यात शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार अस्तित्त्वात आलं. सरकार स्थापन होऊन २१ दिवस उलटून गेले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रोज बैठका घेत आहेत.