लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवाची म्हणजेच लोकसभा निवडणुकांची घोषणा झाली. देशातील १८ व्या लोकसभा निवडणुकांसाठी मुख्य निवडणूक आयुक्तांनी निवडणूक कार्यक्रमाची माहिती देत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी, चर्चेचा विषय ठरला ते त्यांची शेरो-शायरी.
मतदारांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याचं आवाहन मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केले आहे. शिवाय त्यांनी राजकीय पक्षांनाही शायरीतून टोला लगावला आहे. राजकीय पक्षांनी वैयक्तिक टीका-टिपण्णीपासून दूर राहायला हवं, असा सल्ला राजीव कुमार यांनी दिला आहे. यावेळी, त्यांनी बशीर बद्र यांचा एक शेरही ऐकवला.
दुश्मनी जमकर करो; लेकिन ये गुंजाइश रहे,
जब कभी हम दोस्त हो जाएं तो शर्मिंदा न हों.
अशी शायरी निवडणूक आयुक्तांनी यावेळी सर्वांना ऐकवली. त्यानंतर उपस्थित पत्रकारांनी त्यांना टाळ्या वाजवून दादही दिली. आजकाल राजकारणात दोस्ती आणि दुश्मनी दोन्ही लवकर लववकरच होत असल्याचं राजीव कुमार यांनी म्हटलं. त्यांच्या विधानावरही उपस्थितांमध्ये हशा पिकला होता.
ईव्हीएम मशिनबाबत विविध माध्यमातून अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. यावर आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जातात. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, यापूर्वीही ईव्हीएमबाबत अनेकदा सांगितलं आहे. सध्या या विरोधात अभियान देखील सुरु आहे. देशातील संविधानिक न्यायालयांनी म्हणजेच उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने देखील ईव्हीएमवरील तक्रारींवर भाष्य केलं आहे. ईव्हीएमविरोधात आलेल्या सर्व तक्रारी न्यायालयाने निकाल देताना खोडून काढल्या आहेत. न्यायालयाने म्हटलं आहे की, या मशिनला व्हायरस लागूच शकत नाही, यामध्ये मतं बाद होऊच शकत नाहीत, छेडछाड होऊ शकत नाही, ईव्हीएम हे फुलप्रुफ डिव्हाईस आहे. यावर उत्तर देताना त्यांनी शायरी बोलून दाखविली.
अधुरी हसरतो का इल्जाम हर बार हम पर लगाना ठीक नही,
वफा खुद से नही होती खता ईव्हीएम की करते हो
देशातील लोकसभेच्या ५४३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात होईल. महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे २०२४ रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यानंतर, देशातील संपूर्ण लोकसभा निवडणुकांचा निकाल ४ जून रोजी जाहीर होईल.
हे ही वाचा..
महाराष्ट्रात पाच टप्प्यात होणार मतदान
राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणार
गायिका अनुराधा पौडवाल यांचा भाजपा प्रवेश
‘माझ्या प्रिय कुटुंबातील सदस्य’ म्हणत नरेंद्र मोदींनी १४० कोटी भारतीयांना उद्देशून लिहिलं पत्र