बांगलादेशमध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून अराजकता माजली असून हिंसाचार वाढला आहे.अशातच सोमवार, ५ ऑगस्ट रोजी सकाळी शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. एवढेच नव्हे तर त्यांनी थेट बांगलादेशमधून पलायन केलं. सध्या त्या भारतात दाखल झाल्या आहेत. दूसरीकडे, आंदोलकांनी थेट शेख हसीना यांच्या कार्यालयावर हल्ला केला असून या परिसरात जाळपोळही केली आहे. लष्कराने सध्या सत्ता हातात घेतली असून देशात लवकरच अंतरिम सरकार स्थापन केलं जाईल, असं सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेख हसीना यांचे पुत्र साजिब अहमद वाजेद जॉय यांनी शेख हसीना यांच्याबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे.
बीबीसीशी बोलताना साजिब अहमद वाजेद यांनी सांगितले की, “त्यांच्या आईने रविवारीच पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. देशात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, तरी त्यांच्याविरोधात आंदोलन चालूच आहे. सरकारविरोधातील लोकांच्या टोकाच्या रोषामुळे निराश होऊन त्यांनी पंतप्रधानपद सोडण्याचा निर्णय घेतला. तसेच शेख हसीना कदाचित आता बांगलादेशच्या राजकारणात परतणार नाहीत. कुटुंबीयांच्या विनंतीनंतर त्यांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी देश सोडला. १५ वर्षे बांगलादेशामध्ये सत्तेत असणाऱ्या हसीना अत्यंत निराश असून सर्व मेहनत करूनही लोक त्यांच्या विरोधात उठले,” असं साजिब अहमद वाजेद जॉय यांनी स्पष्ट केलं आहे.
हे ही वाचा:
बांगलादेशातील हिंसाचारामुळे आयसीसी चिंतेत; महिला टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे ठिकाण बदलणार?
मूकबधिर तरुणांनीच केली मूकबधिर तरुणाची हत्या, मृतदेह सुटकेसमध्ये
भारतीय महिला टेबल टेनिस संघाची कमाल, रोमानियाचा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेश !
गिरगावात भररस्त्यात पत्नीवर चाकूने वार करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
साजिब वाजेद म्हणाले की, “माझ्या आईने वयाची सत्तरी पार केली आहे. त्यांनी कठोर परिश्रम घेतले तरी काही मोजक्या लोकांनी सरकारविरोधात बंड केलं. पाठोपाठ देशातील बहुसंख्य जनता त्यास बळी पडली आहे. माझ्या आईने देशाची कमान आपल्या हाती घेतल्यानंतर देशात अनेक सकारात्मक बदल घडवून आणले. आई पंतप्रधान झाली तेव्हा बांगलादेश हा जगातील अपयशी देशांच्या यादीत होता. हा एक गरीब देश मानला जात होता. परंतु, आता आपला देश आशिया खंडातील उदयोन्मुख देशांपैकी एक आहे. आपल्या देशाने अनेक आघाड्यांवर मोठी प्रगती केली आहे.”