बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांचा पक्ष अवामी लीगने विक्रमी पाचव्यांदा सत्ता मिळवली आहे. तुरळक हिंसाचाराच्या घटना आणि विरोधी पक्षांनी निवडणुकीवर टाकलेला बहिष्कार या पार्श्वभूमीवर अवामी लीगने दोन तृतीयांश जागा जिंकल्या आहेत.
एकूण ३०० जागांच्या बांग्लादेश संसदेत हसिना यांच्या पक्षाने २०० जागा जिंकल्या असून मतमोजणी अद्यापही सुरू आहे. ‘आता हाती आलेल्या निकालानुसार आपण अवामी लीग हे विजेते ठरल्याचे जाहीर करू शकतो, मात्र अन्य मतदारसंघांमधील मतमोजणी संपल्यानंतरच अंतिम घोषणा केली जाईल,’ असे निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्यांनी स्पष्ट केले. ३०० पैकी २९९ मतदारसंघांमध्ये बहुतांश मतदान शांततेने पार पडल्याचे आयोगाच्या प्रवक्त्यांतर्फे सांगण्यात आले. एका मतदारसंघातील उमेदवाराचा मृत्यू झाल्याने येथील निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे.
बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षासह अन्य विरोधी पक्षांनी टाकलेल्या बहिष्काराबाबत शेख हसिना यांना विचारले असता, ‘लोकांनी ही निवडणूक स्वीकारली की नाही, हे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्या (विदेशी माध्यमांच्या) स्वीकृतीची मला पर्वा नाही. दहशतवादी पक्षाने काय म्हटले किंवा नाही हे महत्त्वाचे नाही,’ असे शेख हसिना यांनी स्पष्ट केले.
हसिना १९८६नंतर आठव्यांदा गोपालगंज – ३ मतदारसंघातून विजयी झाल्या. त्यांना दोन लाख ४९ हजार ९६५ मते मिळाली. तर, त्यांचे प्रतिस्पर्धी बांगलादेश सुप्रीम पार्टीचे एम. निजामुद्दीन लष्कर यांना केवळ ४६९ मते मिळाल्याचे आयोगाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
अजित पवार म्हणाले, ८० वय झालं तरी माणूस थांबत नाही
पोटातून आणलेली कोकेनची कॅप्सूल पकडली; सकिनाका येथे दोन विदेशी नागरिकांना अटक!
मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे १०० वर्षांची परंपरा लाभली!
एकूण २७ राजकीय पक्षांनी ही निवडणूक लढवली होती. या पक्षांतर्फे सुमारे १५०० उमेदवार रिंगणात होते. शिवाय, ४३६ अपक्षांनीही नशीब आजमावले होते. रविवारी झालेल्या मतदानासाठी एकूण ११.९६ कोटी नोंदणीकृत मतदार होते. एकूण १०० परदेशी निरीक्षकांनी या सर्वसाधारण निवडणुकांवर देखरेख ठेवली. यात तीन भारतीय अधिकाऱ्यांचाही समावेश होता.