राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या प्रचारासाठी राजस्थानला गेले असताना त्यांच्या स्वागताच्या एका पोस्टरवर हिंदूहृदय सम्राट असा उल्लेख होता. यावरून ठाकरे गटाने एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. शिवाय ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका करताना म्हटलं होतं की, गद्दारांना हिंदूहृदय सम्राट म्हणायची नवी पद्धत नव्या हिंदुत्वात आलेली दिसते. यावर शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी संजय राऊत आणि ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला आहे.
“बाळासाहेब ठाकरेंना जनाब म्हटलं गेलं तेव्हा महाज्ञानी विश्वप्रवक्ते कुठे होते? असा सणसणीत सवाल शीतल म्हात्रेंनी संजय राऊत यांना विचरला आहे. “हिंदूहृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना ‘जनाब’ म्हटलं गेलं तसंच हिंदूहृदय सम्राट ही उपाधी बाळासाहेबांच्या नावापुढे लावण्यासाठी ज्यांना लाज वाटत होती तेव्हा तुम्ही सत्तेत होतात. मला आमच्या महाज्ञानी विश्वप्रवक्त्यांना विचारायचं आहे जेव्हा बाळासाहेबांना जनाब म्हटलं गेलं तेव्हा तुम्ही गप्प बसला होतात,” अशी टीका म्हात्रे यांनी केली आहे.
“राजस्थानमध्ये शिवसेनेच्या काही शिवसैनिकांनी, एकनाथ शिंदेंवर प्रेम करणाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचा उल्लेख हिंदूहृदय सम्राट असा केला तर तुमच्या पोटात का इतकं ढवळलं गेलं आहे? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कधी स्वतःला पक्षप्रमुख असंही म्हटलं नाही. त्यांनी स्वतःला मुख्य नेते असं म्हटलं आहे. आम्हाला या पदाची कधी गरज नव्हती. कारण आम्हाला माहीत आहे की हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेच आहे. त्यामुळे उगीचच दोरीला साप म्हणून धोपटू नका. आपण हिंदूहृदय सम्राट सत्तेत असताना का नाकारली याचं उत्तर जनतेला द्यावं.” अशी घणाघाती टीका शीतल म्हात्रे यांनी केली आहे.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजपाच्या प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या स्वागताचे जे पोस्टर्स राजस्थानमध्ये लावण्यात आले होते त्यावर हिंदूहृदय सम्राट एकनाथ शिंदे असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून टीका करण्यात येत होती.
हे ही वाचा:
ताडोबातल्या वाघाने जोडीदाराच्या शोधात केला २ हजार किलोमीटरचा प्रवास
ऑक्सिजन प्रकल्प कंत्राटात गैरव्यवहार प्रकरणी रोमीन छेडाला अटक
स्वतःला सोनिया हृदयसम्राट, राहुल हृदयसम्राट, शरद हृदयसम्राट अशा पदव्या लावा!
‘डीपफेक’बाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी सात दिवसांत धोरणांमध्ये आवश्यक बदल करावेत
संजय राऊत काय म्हणाले होते?
“त्यांचा पक्ष म्हणजे जो काही गट त्यांनी स्थापन केला आहे तो गट आणि अजित पवार गट हे भविष्यात भाजपात विलीन होणार आहेत. त्यांनी स्वतःला कितीही पदव्या बाहेर लावल्या तरीही महाराष्ट्रात अशा पदव्या लावायची यांची हिंमत नाही. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ तिथे अशा पदव्या लावत आहेत. उद्या अमेरिकेत जो बायडेन यांच्या प्रचाराला गेले तर तिथेही असंच करतील,” अशी टीका त्यांनी केली होती.