भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे टीकाकार असतानाही त्यांना एका कार्यक्रमासाठी संघातर्फे बोलावण्यात आले, यावरून प्रणव मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी आपले परखड मत व्यक्त केले.
बरखा दत्त यांच्याशी झालेल्या मुलाखतीदरम्यान या प्रसंगावर शर्मिष्ठा मनमोकळेपणाने व्यक्त झाल्या. काँग्रेसपेक्षा आरएसएस ही अधिक सहिष्णू असल्याचे त्या म्हणाल्या.
शर्मिष्ठा म्हणाल्या की, माझे वडील प्रणव मुखर्जी जेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट देणार हे मला कळले तेव्हा मी प्रचंड चिडले. तेव्हा मी काँग्रेसमध्ये पूर्णपणे सक्रीय होते. माझ्या वडिलांनी त्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील बंदीचे समर्थनही केले होते. अशा परिस्थितीतही ते आरएसएस मुख्यालयाला भेट देत आहेत, हे कळले तेव्हा मला राग आला.
मी त्यांच्या या निर्णयाविरोधात ट्विटही केले होते. मी केवळ त्यांच्यावर चिडले नाही तर आमचे जोरदार भांडणही झाले. तुम्ही तिथे का जात आहात, काय गरज आहे, असे प्रश्नही मी त्यांना रागावून विचारले. तुम्ही आरएसएस मुख्यालयाला भेट दिल्यामुळे आपोआपच त्या संघटनेला एकप्रकारची मान्यता तुम्ही देत आहात, असे शर्मिष्ठा यांनी प्रणव मुखर्जींना विचारले.
तेव्हा प्रणव मुखर्जी म्हणाले की, मी आरएसएसला मान्यता देणारा कोण आहे? किंबहुना, भारतातील लोकांनी आरएसएसला मान्यता दिलेली आहे, ती त्यांच्या एका प्रचारकाची पंतप्रधान म्हणून निवड करून. तेदेखील भरघोस बहुमताने. जर तू त्याकडे दुर्लक्ष करणार असशील तर त्याला तू जबाबदार असशील.
हे ही वाचा:
प. बंगाल मध्ये तृणमूलच्या कार्यकर्त्याची हत्या
आतिशी यांनी तोडले आचारसंहितेचे नियम, एफआयआर दाखल
शर्मिष्ठा म्हणाल्या की, मी जेव्हा यावर नंतर विचार केला तेव्हा माझ्या लक्षात आले की, आरएसएसविरोधात प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलेल्या भूमिकेनंतरही आरएसएसने त्यांना आमंत्रित केले होते. त्यामुळे या घटनाक्रमावरून लक्षात येते की, आरएसएस ही काँग्रेसपेक्षाही अधिक सहिष्णू आहे. कारण प्रणव मुखर्जी यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे हे माहीत असतानाही प्रणव मुखर्जी यांना आरएसएसने आपल्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केले. एकूणच मी या सगळ्या प्रकरणात खूप अपरिपक्वपणे वागले होते, हेच मला वाटले.