राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार हे ब्राह्मण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार आहेत. पुणे येथे विवीध ब्राह्मण संघटनांचे पदाधिकारी आणि शरद पवार यांच्यात भेट होणार आहे. पण या बैठकीवर ब्राह्मण महासंघाने मात्र बहिष्कार घातला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अमोल मिटकरी आणि छगन भुजबळ यांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील ब्राह्मण समाज नाराज झाला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवण्यात आली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका होत होती. त्यानंतर शरद पवारांनी पुण्यात ब्राह्मण संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना भेटीचे आमंत्रण दिले. पण पवारांचे आमंत्रण धुडकावत ब्राह्मण महासंघाने भेटीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
हे ही वाचा:
नवाब मलिकांचे दाऊदच्या टोळीशी थेट संबंध
शिवलिंगाबद्दलची आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानंतर प्राध्यापकाला अटक
२०२० चे प्रकरण उकरून काढत, केतकी चितळेंवर कारवाई
राणा दाम्पत्याला मुंबई महापालिकेकडून अल्टिमेटम
शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे अमोल मिटकरी आणि छगन भुजबळ यांना समर्थन दिल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे शरद पवार यांनी या दोन्ही नेत्यांच्या वक्तव्याबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी आणि नंतरच भेटीचा विचार करणार असल्याचे महासंघाकडून सांगण्यात येत आहे. तर ब्राह्मण महासंघासोबतच परशुराम संघ या संघटनेनेही शरद पवारांना भेटण्यास नकार दिला आहे.
आज म्हणजेच शनिवार, २१ मे रोजी शरद पवार हे यासंदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत. तर पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर ब्राह्मण महासंघाची ही पत्रकार परिषद होणार आहे. त्यामुळे परिषदांकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.