शरद पवारांचा राजीनामा नामंजूर, समितीने घेतला निर्णय

समितीच्या बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी केले जाहीर

शरद पवारांचा राजीनामा नामंजूर, समितीने घेतला निर्णय

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी २ मे रोजी आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यासंदर्भात निर्णय घेणाऱ्या समितीने हा राजीनामा नामंजूर केला असून शरद पवार हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राहतील, अशा स्वरूपाचा प्रस्ताव मान्य केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचा समावेश असलेल्या या निवड समितीने घेतलेल्या या निर्णयानंतर महाराष्ट्रात विविध ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून, घोषणाबाजी करून आनंद साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषदेत समितीचा हा निर्णय जाहीर केला. त्यांनी आपल्या या समितीचा निर्णय पत्रकारांना वाचून दाखविला.

प्रफुल्ल पटेल यांनी वाचून दाखविलेला निर्णय असा-

प्रफुल्ल पटेल म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा मनोदय व्यक्त केला होता. पवार यांचा राजीनामा एकमताने नामंजूर करण्यात येत असून त्यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहावे, अशी विनंती करण्यात येत आहे.

आमची सर्वांची भावना सामुहिक आणि सर्वानुमते ही आहे की पवारांनी या पदावर कायम राहावे. राजीनामा देण्याची जी घोषणा केली त्यांच्या आमच्या सर्वांच्या लोकांच्या भावनांचा आदरपूर्वक विचार करून त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करणार आहोत.

पवार यांना पर्याय नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले तर छगन भुजबळ म्हणाले की, देशाचे नेते शरद पवार यांनी दिलेला राजीनामा आम्ही नामंजूर करत आहोत. या पदावर कायम राहावं अशी विनंती आम्ही करत आहोत. कार्याध्यक्षपद वगैरे नंतर. तो शरद पवारांचा अधिकार असेल. शरद पवारांनाही हा निर्णय मान्य करावाच लागेल. आमच्या भावना लक्षात घ्याव्याच लागतील.

विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मात्र यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. अजित पवार देखील हा निर्णय जाहीर केल्यानंतर निघाले पण त्यांनी पत्रकारांशी बोलणे टाळले. त्यामुळे अजित पवारांची यासंदर्भातील भूमिका नेमकी काय हे कळलेले नाही.

हे ही वाचा:

अल्पसंख्यांकांच्या सुरक्षेच्या बाता मारणाऱ्या पाकिस्तानमध्ये ५० हिंदूंचे धर्मांतर

पाकिस्तानमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ शिक्षकांचा मृत्यू

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला

इम्रान खान यांना धक्काबुक्की, पुन्हा पायाला दुखापत

२ मे रोजी शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनप्रसंगी शरद पवारांनी हा निर्णय घेतला. त्यानंतर महाराष्ट्रात खळबळ उडाली. तेव्हापासून अध्यक्षपदी विरोधीपक्ष नेते अजित पवार येतील का की शरद पवार यांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे जबाबदारी सोपविली जाईल, याविषयी चर्चा केली जाऊ लागली. ५ मे रोजी त्याबद्दल निर्णय होईल असे म्हटले गेले पण केवळ शरद पवारांचा राजीनामा स्वीकारायचा नाही, एवढाच निर्णय समितीने घेतला. त्यामुळे आता शरद पवार हा निर्णय स्वीकारणार का याकडे लक्ष आहे.

Exit mobile version