राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आणि त्याचे परिणाम महाविकास आघाडीच्या वाटचालीवरही होऊ लागलेले आहेत. वज्रमूठ सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सुरू असलेल्या राजकारणालाही पवारांच्या या निर्णयामुळे खीळ बसल्याचे समोर येते आहे.
येत्या १४ मे रोजी पुणे येथे वज्रमूठ सभा होत आहे तर त्यानंतर २८ मे रोजी कोल्हापूर, ३ जूनला नाशिक आणि ११ जूनला अमरावती अशा सभा होत आहेत. पण या सगळ्या सभा रद्द झाल्याचे वृत्त आहे. या सगळ्या सभा पुढे ढकलण्यात आल्याचेही म्हटले जात आहे.
यासंदर्भात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले की, सध्या तीव्र स्वरूपाचा उन्हाळा आहे, त्यामुळे वज्रमूठ सभेचे आयोजन करण्यासंदर्भात काय करता येईल याचा विचार करावा लागेल. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अवकाळी पाऊस हा वज्रमूठ सभेसाठी अडथळा ठरणार असल्याचे विधान केले आहे. मात्र ठाकरे गटाचे नेते सचिन अहीर यांनी या सभा रद्द झालेल्या नसून पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत. मात्र त्या यानंतर कधी होतील याविषयी अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, असे म्हटले आहे.
शरद पवारांच्या या निर्णयानंतर या सगळ्या घडामोडी घडू लागल्यामुळे गेल्या तीन सभांमध्ये भक्कम असलेली वज्रमूठ ही आता सैल पडू लागली आहे का, येत्या काळात महाविकास आघाडीच्या या वज्रमुठीचे काय होणार असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जाऊ लागले आहेत.
हे ही वाचा:
वृद्ध पद्म पुरस्कारविजेत्या महिलांनी पंतप्रधानांचे केले अनोखे कौतुक
चेंबूर हादरले; संपत्तीच्या वादातून निवृत्त पोलीस उपायुक्ताच्या मुलाची हत्या
‘द केरला स्टोरी’ विरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
मुंबईचे डबेवाले ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्सला देणार पुणेरी पगडीचा मान
शरद पवारांनी जेव्हा हा निर्णय घेतला त्याआधी, त्यांच्या आत्मचरित्रात्मक अशा लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे प्रकाशनही पार पडले. त्या पुस्तकात उद्धव ठाकरे यांच्यावर एक प्रकरण असून उद्धव ठाकरेंच्या उणिवांवर बोट ठेवण्यात आले आहे. त्याचीही चर्चा आता लगेच सुरू झाली आहे. त्यात उद्धव ठाकरेंकडे राजकीय चातुर्याचा असलेला अभाव, पक्षातील धुसफूस रोखण्यात आलेले अपयश, मुख्यमंत्रीपदाचा त्यांनी घाईगडबडीने दिलेला राजीनामा, त्यांचे प्रकृती अस्वास्थ्यामुळे का असेना पण मंत्रालयाकडे न फिरकणे अशा मुद्द्यांवर भर देण्यात आलेला आहे. यातून उद्धव ठाकरे नाराज झालेले असण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.
याबाबत ठाकरे यांच्या गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी लवकरच ठाकरे याला प्रत्युत्तर देतील असे म्हटले आहे. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीतला हा संघर्ष तीव्र होईल का, याविषयी नवनव्या अटकळी बांधल्या जात आहेत. सध्या शरद पवार यांचा राजीनामा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल याकडेच महाराष्ट्रातल्या राजकारणाचा केंद्रबिंदू वळला आहे. त्यामुळे येत्या ५ तारखेला नवा अध्यक्ष राष्ट्रवादीला मिळाला तर किंवा त्यासंदर्भात आणखी काही दिवस विलंब होणार असेल तर सगळे राजकारण शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याभोवतीच घुटमळत राहील असा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे मे महिन्यात होणाऱ्या दोन वज्रमूठ सभा आणि जूनमध्ये होणाऱ्या दोन सभा होतील की नाही, याविषयी शंका उपस्थित होत आहे.